फोटो ,सौजन्य: गुगल
कर्जत/ संतोष पेरणे : पेण तालुक्यातील वरवणे शासकीय आदिवासी शाळेतील चौथी मध्ये शिकणारी खुशबू नामदेव ठाकरे हिच्या मृत्यू प्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाचे आमदार पुढे सरसावले आहेत. अमरावती जिल्ह्यातील आमदार हेमंत ओगले यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सलग दुसऱ्यांदा प्रश्न उपस्थित केला.
दरम्यान,खुशबू मृत्यू प्रकरणी तिच्या कुटुंबीयांना न्याय देईपर्यंत आमचा लढा सुरू राहिला असा निर्धार पेण येथील कार्यकर्त्या नंदा म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे.
२२ जानेवारी रोजी पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता.सुदृढ असलेल्या खुशबू ठाकरे या मुलीला कुष्ठरोगी ठरवून तिला चुकीची औषधे दिली आणि त्यामुळे कुष्ठरोगाची औषधे सुरू केल्यानंतर अवघ्या महिन्याभरात खुशबू च्या लिव्हर मध्ये सूज आली आणि तिचा मृत्यू झाला. हा प्रश्न अर्थसंकल्प अधिवेशनात काँग्रेस पक्षाचे आमदार हेमंत ओगले यांनी मंगळवारी उपस्थित केला. त्यावेळी या प्रकरणी शासकीय आश्रमशाळा व्यवस्थापन यांनी पालकांना न कळविणे,आरोग्य विभागाने पुरेशी खात्री न करणे आणि पोलीस प्रशासनाने कारवाई करण्यात केलेली कुचराई याबाबत ताशेरे अधिवेशनात एक तासाच्या प्रश्न उत्तराच्या तासात ओढले होते.
मात्र त्यावेळी सरकार कडून कोणतेही उत्तर आले नव्हते. हा प्रश्न पुन्हा एकदा स्थानिक आदिवासी समाज आणि कार्यकर्ते उपोषणाला बसण्याच्या तयारीत असल्याचे सभागृहाचे निदर्शनास आणून दिले होते.खुशबूचे मृत्यू प्रकरणी सरकार आमदारांच्या अधिवेशनात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याचे गांभीर्य ठेवत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे आज ७ मार्च रोजी अमरावती जिल्ह्यातील आमदार आदिवासी समाजाचे हेमंत ओगले यांनी पुन्हा एकदा हा प्रश्न विधिमंडळात उपस्थित केला.
यावेळी आमदार ओगले यांनी खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरणी सरकारने चुकीची औषधे देणाऱ्या पेण तालुक्यातील कामार्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कारवाई करावी.तसेच पेण तालुक्यातील आदिवासी विकास विभागाच्या वरवणे शासकीय आश्रमशाळा व्यवस्थापन यांच्यावर कारवाई करावी अशी आग्रही मागणी केली आहे.त्यामुळे याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात पेण तालुक्यातील वरवणे शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील चौथी मध्ये शिकणारी खुशबू नामदेव ठाकरे हिच्या मृत्यू प्रकरणी सरकार कडून ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.
पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आश्रमशाळा मधील खुशबू नामदेव ठाकरे मृत्यू प्रकरणी आवाज उठविणाऱ्या राजीव गांधी पंचायत राज मिशनचे राष्ट्रीय सचिव नंदा म्हात्रे यांनी आमदार हेमंत ओगले यांचे आभार मानले आहेत.हा लढा खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरणी ठाकरे कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत सुरूच राहील असा निर्धार पेण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.तर आदिवासी समाजातील पालकांना आपल्या पाल्यांना आश्रमशाळेत पाठवण्याची भीती वाटू लागली आहे.त्यासाठी सरकारने असे प्रकार घडल्यावर कारवाई करावी आणि आदिवासी समाजाला आश्वस्त करावे अशी सूचना आदिवासी कार्यकर्ते जैतू पारधी यांनी केली आहे.