 
        
            
अलिबाग : पर्यटकांनो तुम्ही जर फिरण्यासाठी अलिबागचा प्लॅन करत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. मुंबई पुण्यापासून अनेकांना जवळ असलेलं पर्यटन स्थळ म्हणजे अलिबाग. मुंबई पुण्यावरुन हे ठिकाण अत्यंत जवळ आहे. मुंबईवरुन अलिबागला जाण्यासाठी सागरी मार्गाचा पर्याय अनेकजण करतात. त्यामुळे मुंबईच्या जवळपास राहणारे फिरण्यासाठी अलिबागला जाणं पसंत करतात. मात्र आता हाच सागरी मार्ग जीवघेणा ठरण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
अलिबागला जाण्यासाठी प्रवासी मांडवा जेट्टीने जातात. मात्र ही जेट्टी आता जीवघेणी ठरतेय का ? असा सवाल देखील उपस्थित झाला आहे. गेटवे-मुंबई ते मांडवा-अलिबाग जलमार्गावरील मांडवा जेट्टी कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आली आहे. पुलाच्या खांबांवरील सिमेंट गळून पडल्याने लोखंडी सळया बाहेर आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सगळ्याचा गंभीर समस्येने प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. जेट्टीवरील पत्र्यांचे शेड गंजल्यामुळे काढून टाकण्यात आले असून पाऊस व उन्हात प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. प्रवासादरम्याने इतकी आव्हानं असून देखील प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत असल्याने हा प्रवाशांच्या जीवाशी होणारा खेळ आहे अशी खंत देखील व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेटवे – मुंबई व मांडवा – अलिबाग या जलमार्गावर गेल्या काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या मुंबई पोर्ट ट्रस्ट तर्फे मांडवा येथे नवीन जेट्टी उभारण्यात आली होती, या जेट्टीचे मान्यवरांच्या हस्ते मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले. मात्र काही वर्षातच निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या जेट्टीवरील पुलाच्या खांबांचे सिमेंट गळून पडत असल्यामुळे अनेक ठिकाणी खांबांच्या सळया बाहेर आल्या आहेत. सदर बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे सदर पुलाला धोका निर्माण झाला असून त्यामुळे हा पूल कोणत्याही क्षणी कोसळण्याची स्थिती नाकारता येत नाही अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. या जलमार्गावर पावसाळ्यात सुरक्षेच्या कारणास्तव २५ मे ते ३० ऑगस्ट पर्यंत प्रवासी वाहतूक पुर्णतः बंद केली जाते, मात्र आता १ सप्टेंबर पासून हि प्रवासी वाहतूक (वादळवारा वगळता) पुन्हा सुरु करण्यात आली आहे. पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या व मिनी गोवा म्हणून पर्यटकांची प्रथम पसंती असलेल्या अलिबाग, मुरुड, श्रीवर्धनकडे येणारे पर्यटक वेळेची व इंधनाची बचत तसेच आरामदायी प्रवास असल्यामुळे या मार्गाने हजारोंच्या संख्येने दररोज पर्यटक व इतर सर्व प्रवासी प्रवास करतात. जेट्टीवरील खांब निकृष्ठ झाल्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या पर्यटकांचा व इतर प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. यासोबतच या जेट्टीवरील ठिकाणी असणाऱ्या पत्र्याच्या शेडवरील लोखंडीपत्रे गंजल्यामुळे काढण्यात आले आहेत तर काही प्रमाणात पत्रे बसविण्याचे काम संथगतीने सुरू आहे.
जेट्टीवरील ठिकाणी जेट्टी ते वाहनतळ ठिकाणी ये-जा करताना दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, स्तनदा माता व आजारी रुग्णांच्या सेवेसाठी असलेल्या वाहनांची संख्या १ ते २ असून प्रवाशांची संख्या लक्षात घेता तीसुद्धा सेवा देण्यासाठी अपुरी व कमी पडत आहे, यामुळे शारीरिक क्षमता कमजोर असलेल्या प्रवाशांना सामानसुमानासह चालत जाताना मोठ्या प्रमाणात शारीरिक व मानसिक मनस्ताप सहन करावा लागत आहे. यासोबतच जेट्टीवर प्रवाशांना मोफत पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने प्रवाशांना अधिकचे पैसे देऊन विकतचे पाणी प्यावे लागत असल्याने नाहक आर्थिक भुर्दंड भरावा लागतो आहे. तसेच जेट्टीवर शौचालयाची कोणतीच सोय उपलब्ध नसल्याने महिला प्रवाशांसह सर्वांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. आजारी रुग्ण, दिव्यांग, यांना बोटीतून चढ उतार करताना व्हीलचेअरची सुविधा नसल्याने या प्रवाशांच्या हालाला पारावर उरत नाही. यासोबतच बोटीवर जाण्यासाठी वाट पाहत रांगेत उभे राहत असलेल्या ठिकाणी प्रवाशांना बसण्याची कोणतीच सुविधा उपलब्ध नसल्याने गरोदर स्त्रिया, आजारी रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदींना ताटकळत उभे राहावे लागत आहे. याठिकाणी असलेल्या गैरसोयीबद्दल महाराष्ट्र सागरी मंडळ प्रशासन कधी जागे होऊन कधी लक्ष देतील,? हा मोठा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
या जेट्टीवर मंत्री, आमदार, खासदार व इतर लोकप्रतिनिधी तसेच प्रतिष्ठित व्यक्तींना घेण्यासाठी व सोडण्यासाठी त्यांची चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात येत असल्याने जेट्टीला मोठा धोका संभवतो आहे. यामुळे जेट्टीवर ये-जा करणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तरी महाराष्ट्र सागरी मंडळाने याकडे लक्ष वेधून कारवाई करावी, अन्यथा जेट्टीला धोका पोहोचून वाहतूक ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी महाराष्ट्र सागरी मंडळाने याकडे लक्ष ठेवून त्यावर लवकरात लवकर ठोस उपाय योजना करावी, अशी अपेक्षा पर्यटक व प्रवाशी व्यक्त करत आहेत.
मांडवा जेट्टीवरील सदर असुविधांबाबतीत प्रतिक्रिया घेण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या जबाबदार अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, मांडवा जेट्टीवरील प्रवासी जेट्टीचे आयआयटी मुंबई यांच्याकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यासंबंधी शासनाकडे दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठविले आहे, ते काम टेंडर काढून लवकरात लवकर करणार आहोत. तसेच जेट्टीवरील पत्र्यांच्या शेडचे काम रेमंड कंपनी करत असून त्यांना काम करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे व ते काम पाऊस असल्याने संथगतीने सुरू करण्यात आले. यासोबतच इतर असुविधांचा विचार करून पाठपुरावा केला जात आहे. असं प्रविण पाटील – महाराष्ट्र सागरी मंडळ अधिकारी यांनी सांगितलं आहे.






