वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन (फोटो- सोशल मीडिया)
पुणे–दिल्ली वंदे भारत सुरू करण्याची मागणी
राज्यसभे खासदार कुलकर्णी यांची मागणी
वेगवान आणि प्रीमियम रेल्वे सेवा सुरू होणे काळाची गरज
पुणे: पुणे–दिल्ली दरम्यान थेट वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी राज्यसभेत उपस्थित करण्यात आली आहे. भाजपच्या राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी ही मागणी रेल्वे मंत्रालयाकडे औपचारिकरीत्या मांडली. पुणे हे शिक्षण, उद्योग, आयटी, संरक्षण आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर असून देशाची राजधानी दिल्लीशी थेट, वेगवान आणि प्रीमियम रेल्वे सेवा सुरू होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले की, सध्या पुणे–दिल्ली दरम्यान धावणाऱ्या गाड्यांवर मोठा ताण असून प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. विशेषतः नोकरदार वर्ग, व्यावसायिक, विद्यार्थी, संरक्षण क्षेत्रातील अधिकारी तसेच प्रशासकीय कामांसाठी जाणाऱ्या प्रवाशांना जलद आणि आरामदायी सेवेची आवश्यकता आहे. वंदे भारत एक्सप्रेससारखी आधुनिक, स्वदेशी बनावटीची ट्रेन सुरू झाल्यास प्रवासाचा कालावधी कमी होईल आणि प्रवाशांना अधिक सोयी-सुविधा मिळतील.
पुणे हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे आर्थिक केंद्र असून दिल्लीशी थेट जोडणी झाल्यास व्यापार, उद्योग, स्टार्टअप्स आणि पर्यटनालाही चालना मिळेल, असेही त्यांनी अधोरेखित केले. तसेच, पुण्यातील आयटी आणि संरक्षण उद्योगांचा थेट संपर्क राजधानीशी अधिक मजबूत होईल. याचा फायदा राज्याच्या एकूण विकासाला होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रेल्वे मंत्रालयाने देशभरात वंदे भारत एक्सप्रेसचे जाळे वाढवण्यावर भर दिला असून, अनेक प्रमुख मार्गांवर ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे–दिल्ली मार्गालाही प्राधान्य देण्यात यावे, अशी अपेक्षा डॉ. कुलकर्णी यांनी व्यक्त केली. या मागणीवर रेल्वे मंत्रालय काय निर्णय घेते, याकडे पुणेकरांसह राज्यातील प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
नांदेड-पुणे मार्गावर ‘वंदे भारत’ धावणार
देशातील अनेक रेल्वे स्थानकांवरून वंदे भारत रेल्वे धावत आहेत. त्यातच नांदेडहून पुण्याला धावणारी दुसरी वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होणार आहे. या सेमी हाय-स्पीड ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ 7 तासांवर येणार आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, डिसेंबर अखेर किंवा जानेवारी २०२६ पर्यंत ही सेवा सुरू होण्याची शक्यता रेल्वे विभागाने व्यक्त केली आहे.






