फोटो सौजन्य : गुगल
रायगड/ विजय मोकल : गुढी पाडव्यानिमित्त सर्वत्र गुढी उभारून, शोभा यात्रा काढून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन होत असतं. मात्र या नववर्षाच्या मुहुर्तावर पेण तालुक्यातील आदिवासी बांधवांनी श्रमदानाची गुढी उभारली आहे. पेणमधील ग्राम पंचायत बोरगाव हद्दीतील उंबरमाळ आदिवासी वाडीतील ग्रामस्थ व ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आदिवासी वाडीच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी श्रमदानातून नैसर्गिक झऱ्याचे खोलीकरण करून जलस्त्रोतांच्या वाढीसाठी श्रमदान करीत गुढी पाडवा साजरा केला आहे.
सुमारे 125 लोकसंख्या असलेल्या पेण तालुक्यातील ग्रुप ग्राम पंचायत बोरगाव हद्दीतील उंबरमाळ आदिवासी वाडीत एकच विहीर असून त्यातील पाणीसाठा कमी झाल्याने येथील आदिवासी बांधवांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय हे लक्षात घेऊन ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी ग्राम संवर्धनच्या कार्यकर्त्यांसह वाडीतील सर्व ग्रामस्थांना एकत्रित करीत वाडीच्या पाणी समस्येबाबत उंबरामाल वाडीत बैठक घेतली. त्या बैठकीतून आदिवासी बांधवांनी वाडीच्या खालच्या बाजूला साधारण पाचशे मीटर अंतरावर असलेल्या एका लहानशा झऱ्याला भरपूर पाणी असल्याचे सुचविल्यानुसार गुढी पाडव्याच्या दिवशी सर्व ग्रामस्थ व ग्राम संवर्धनच्या कार्यकर्त्यांनी श्रमदानातून या झऱ्याचे खोलीकरण करण्याचे ठरविले आहे.
आदिवासी बांधवांच्या या प्रयत्नाला यश आले असून या झाऱ्याला भरपूर पाणी लागले असून त्या ठिकाणी विहीर बांधल्यास वाडीच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटेल असा विश्वास स्थानिक आदिवासी ग्रामस्थ यशवंत वाघमारे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर,राजू पाटील,सचिन पाटील , राजेश रसाळ, महेश पाटील व संजय वाघमारे,संतोष हिलम,सुनील वाघमारे, सतीश पवार,गीता वाघमारे, रेणुका हीलम, गणेश वाघमारे, नीलम पवार, कृष्णा गोगरेकर, विनायक पवार, कमली हिलम, महेंद्र हिलम, सुरेखा वाघमारे, सुमन पवार, रुक्मिणी घोगरेकर यांच्यासह उंबरमाल वाडीतील सर्व ग्रामस्थ या श्रमदानात सहभागी झाले होते.
उंबरमाळ आदिवासी वाडीमध्ये उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होते. त्यामुळे ग्रामस्थांना लांबवरून पाणी आणावे लागते. पिण्याच्या आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची अनुपलब्धता ही मोठी समस्या होती. ही समस्या सोडवण्यासाठी ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन श्रमदानाने नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटेपासूनच ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमाला सुरुवात केली. लहानथोर सर्वांनी मिळून झऱ्यातील गाळ काढला, मोठे दगड हटवले आणि पाण्याच्या प्रवाहाला अधिक जागा मिळावी यासाठी श्रमदान केले. विशेषतः महिला आणि युवकांनी यात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.
या उपक्रमामुळे झऱ्याच्या पाण्याची पातळी वाढेल आणि गावातील पाणीटंचाई काही प्रमाणात तरी कमी होईल, अशी ग्रामस्थांना आशा आहे. भविष्यातही असे श्रमदान उपक्रम राबवून जलसंधारण आणि पर्यावरण रक्षण करावे, असा निर्धार गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.संपूर्ण राज्यभर गुढीपाडवा सण उत्साहाने साजरा केला जातो. मात्र, उंबरमाळ आदिवासी वाडीतील ग्रामस्थांनी पर्यावरण संरक्षण आणि जलसंवर्धनाचा संदेश देत गुढीपाडवा साजरा केला. गुढी उभारून नवी सुरुवात करण्यासोबतच जलस्रोतांचे रक्षण करण्याचा संकल्प केला आहे.