अन् धोका टळला..., रेवदंडा पुलानजीक बुडालेली धोकादायक बार्ज हटविण्याची प्रक्रिया सुरू
रेवदंडा, महेंद्र खैरे : रेवदंडा पुलानजीक गेल्या काही वर्षांपासून बुडालेली बार्ज समुद्राच्या पाण्यातून बाहेर न काढल्याने तेथून जा-ये करणाऱ्या इतर लहान-मोठ्या बोटी, बार्ज यांना धोकादायक ठरत आहे. मात्र आता हीच धोकादायक बार्ज बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
मच्छीमार होडया तसेच छोटया मोठया बार्ज यांना कुंडलिका समुद्र मार्गे प्रवास करताना रेवदंडा पुलानजीक बुडालेली बार्ज बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
रेवदंडा पुलानजीक गेले काही वर्षापासून बुडालेली बार्ज समुद्राच्या पाण्यातून बाहेर न काढल्याने तेथून ये-जा करणारा इतर लहान मोठया बोटी बार्ज यांना धोकादायक ठरत होती. परिणामी मच्छीमार व्यावसायीकांनी ही नाराजी व्यक्त केली होती. बार्ज समुद्र भरतीचे वेळी पुर्णतः बुडत असल्याने रेवदंडा समुद्र किनारी कुंडलिका समुद्र खाडीत ये-जा करत असलेल्या लहान मोठया बोटी, बार्ज यांचे निदर्शनास येत नव्हती. परिणामी पाण्यातील बुडालेल्या बार्जला धडक बसून अपघाताची शक्यता नाकारता येत नव्हती.
गेले अनेक वर्षे संबंधितांनी समुद्रात बुडालेली बार्ज काढण्याची कोणतीही खबरदारी घेतली नव्हती. त्यामुळे येथून जा-ये करताना बोटी, बार्ज यांना सावधानता बाळगावी लागत होती. तसेच कुंडलिका समुद्र खाडीत नवीन बोट अथवा बार्ज येथून जा-ये करत असल्यास बुडालेली बार्ज भरतीचे वेळी दिसत नसल्याने व बुडालेल्या बार्ज बद्दल माहिती नसल्याने अपघाताची शक्यता होती. याबाबत बंदर रेवदंडा बंदर निरिक्षक सतिश देशमुख यांचेशी संपर्क केला असता, समुद्रात बुडालेली बार्ज काढून घेण्याबाबत संबधीत बार्ज मालकास सुचना केली आहे. मात्र याबाबत बार्ज मालकांनी कोणत्याही प्रकारचे सहकार्य दिले नसल्याचे म्हटले होते. मात्र संबधीत बार्ज मालकांनी सदर बार्ज काढून घेण्याची प्रक्रिया सुरू केल्याने स्थानिक मच्छीमार व्यावसायीकानी समाधान व्यक्त केले आहे.
अलिबाग पनवेल विनावाहक बसचा जिते गावाजवळ अपघात
तर दुसरीकडे अलिबाग बसस्थानकातून बुधवार (२५ जून) सकाळी ६:४५ वाजता अलिबागवरून सुटलेली अलिबाग ते पनवेल विनावाहक बसचा अपघात झाल्याची घटना समोर आली. एम एच ०६ बी डब्ल्यू ४३७३ क्रमांक असलेली शिवसाई बसचा मुंबई गोवा महामार्गावर पेण ते पनवेल दरम्यान जिते गावाजवळ सकाळी आठ वाजताच्या सुमारास ट्रकला पाठीमागून ठोकल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. या बसमध्ये एकूण २० प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर काही प्रवाशांना किरकोळ स्वरूपात जखमा झाल्या आहेत तर काही प्रवाशांना मुका मार लागला असल्याची प्राथमिक माहिती प्रवाशांनी दिली आहे. अपघातानंतर बसचा दरवाजा उघडता येत नसल्याने सर्व प्रवाशांना ड्रायव्हर बाजूने बाहेर काढण्यात आले. यानंतर सर्व प्रवाशांना पाठीमागून येणाऱ्या बस मध्ये बसवून मार्गस्थ करण्यात आले आहे.