मुंबई : अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर आजपासून (१९ जून) राज्यात पोलीस भरती प्रक्रियेला सुरूवात झाली. पण पावसाने हजेरी लावल्यामुळे मुंबईतील मीरा-भाईंदर आणि वसई विरार या भागातील पोलीस भरती प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे.
याबाबत, अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मीरा-भाईंदर येथील भाईंदर वेस्ट येथील सुभाष चंद्र मैदानावरती पोलीस भरतीची शारीरिक चाचणी सुरू झाली.पण अचानक आलेल्या पावसामुळे मैदानावर पाणी साचले आणि मैदानात सुरू असलेल्या पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणी थांबवावी लागली. पोलीस भरतीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उमेदवार या मैदानावरती उपस्थित आहेत. परंतु मैदानावर पाणी साचल्याने शारीरिक चाचणी प्रक्रिया सुरू करण्यात अडथळा येत आहे.’’ असे पाठक यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज्यभरात पोलीस आयुक्तालय, ग्रामीण पोलीस, रेल्वे पोलीस व राज्य राखीव दलातील (एसआरपीएफ) अंमलदार (शिपाई), विभागातील चालकपदासाठी आजपासून मैदानी चाचणीतून भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. काही हजार पदासांठी लाखोंच्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधील आयुक्तालय व कारागृह यांतील ५२७ पदांसाठी जवळपास ८६ हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. भरती प्रक्रियेतील गैरप्रकार टाळण्यासाठी बायोमॅट्रिक पद्धत वापरण्यात येणार आहे.
दरम्यान, 17, 471 जागांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज प्राप्त झाले आहेत. बँड्समन पदासाठी 41 जागा असून त्यासाठी 32,026 जणांनी अर्ज केले आहेत. चालक पदासाठी 1,686 जागांसाठी तब्बल 1 लाख 98 हजार 300 अर्ज मिळाले आहेत. तुरूंग विभागातील शिपाई पदासाठी 1800 जागा उपलब्ध असून या पदासाठी 3 लाख 72 हजार 354 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तर पोलीस शिपाई पदासाठी सर्वाधिक जागा आणि सर्वाधिक अर्ज आले आहेत. 9595 जागांसाठी तब्बल 8 लाख 22 हजार 984 अर्ज आले आहेत.






