(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या कलाकरांची लगीनघाई सुरू आहे. अनेक जोड्या या वर्षात लग्नबंधणात अडकताना दिसत आहेत. नुकतंच साक्षी महाजन आणि अथर्व कर्वे हे विवाहबंधणात अडकल्याचे आपण पाहिले. आता यात आणखी एक अभिनेत्री बोहल्यावर चढणार आहे. अनेक मालिकांमध्ये काम करून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अक्षया हिंदळकर लवकरच लग्न करणार आहे. अक्षया लोकप्रिय अभिनेता आणि ‘बिग बॉस मराठी’ फेम विशाल निकमसह लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. अभिनेत्रीच्या घरी लग्नापूर्वीच्या विधींना सुरूवात झाली असून तिचा मेहेंदळी सोहळा नुकताच पार पडला आहे. याचे फोटो अक्षयाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मेहेंदी सोहळ्यासाठी अक्षयाने खास लूक केला होता. तिने इरकल साडीचा पारंपरिक ड्रेस परिधान केला होता. तर तिच्या हातावर खास सखी आणि फुलपाखराची डिझाइन मेहेंदीतून काढल्याचे दिसत आहे. या खास सोहळ्याचे फोटो पोस्ट करत तिने विशाल निकमला टॅग केलं आहे. ”माझ्या मेहेंदीमध्ये तुझं नाव शोधायला तयार राहा”, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.
बिग बॉस मराठीच्या घरात विशालने त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती. मात्र त्याने त्याच्या सुंदराचं नाव गुलदस्यात ठेवलं होते. काही दिवसांपूर्वीच अक्षया आणि विशालने त्यांचं नातं ऑफिशियल केलं आहे. आता ही जोडी नवीन आयुष्याला सुरूवात करण्यात आहे. अक्षयाने ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’, ‘साता जन्माच्या गाठी’ आणि ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली आहे.
तर विशाल निकम हा मराठी टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय चेहरा आहे. त्याने ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’, ‘आई मायेचं कवच’ आणि ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या तो स्टार प्रवाहवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे.






