जत येथे बेदाण्याला उच्चांकी 291 रुपये दर; पहिल्याच दिवशी 20 टन आवक (Photo : iStock)
जत : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जत येथील राजे विजयसिंह डफळे दुय्यम बाजार आवारात बेदाणा सौद्याचा प्रारंभ झाला. या सौद्यात पहिल्याच दिवशी सांगली जिल्ह्यासह कर्नाटक सीमावर्ती भागातून 20 टन बेदाण्याची आवक झाली. सौद्याचा प्रारंभ माजी सभापती बसवराज बिराजदार, बाजार समितीचे संचालक रमेश पाटील, सहाय्यक सचिव सोमनिंग चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला.
सांगली बाजार समिती व तासगावनंतर जतमध्ये बेदाणा सौद्यांना गतवर्षीपासून सुरुवात झाली आहे. यावर्षीच्या सौद्यांना रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. सौद्यांमध्ये जत व सांगलीतून व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला. यात अंकलगी (ता.जत) येथील शेतकरी सिद्धाना तेली यांच्या बेदाण्याला संख येथील वीरभद्रेश्वर ट्रेडिंग कंपनीचे प्रवीण आवारादी यांनी प्रतिकिलो २९१ रुपये उच्चांकी बोली लावली.
दरम्यान, सौद्यामध्ये कमीत कमी २५३ प्रति किलोस दर मिळाला. सर्व शेतकऱ्यांनी उत्पादित बेदाणा जत दुय्यम बाजार आवारातील सौद्यामध्ये आणावा, असे आवाहन संचालक रमेश पाटील यांनी केले. गतवर्षी बेदाणा सौद्यात २७५ रुपयापर्यंत भाव मिळाला होता.
दर रविवारी बेदाणे सौदे निघणार : सुजय शिंदे
जत बाजार आवारात दर रविवारी बेदाण्याचे सौदे सुरू राहणार आहेत. बेदाणा खरेदी-विक्री धारकांची उलाढाल, आवक वाढल्यास दर गुरुवारी बेदाणे सौदे काढण्याचा विचार सुरू आहे. तरी उत्पादित शेतीमालाला योग्य भाव मिळवून देण्याची भूमिका बाजार समितीची राहील, बाजार समितीच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बेदाणा जत येथील सौद्यात आणावा, असे आवाहन सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी केले आहे.