मनसेच्या बिनशर्त पाठिंब्याची युतीकडून परतफेड होणार?
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड विधानसभा निवडणुकीत करण्याबाबत या तींन नेत्यात चर्चा झाल्याचे समजते.
लोकसभा निवडणुकीवेळी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी महायुतीला कोणत्याही अटी-शर्थीशिवाय पाठिंबा देत असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते. विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. या निवडणुकीत मनसेच्या काही उमेदवारांना पाठिंबा देण्यासंदर्भात महायुतीच्या नेत्यांसोबत राज ठाकरे यांची शनिवारी रात्री बैठक झाल्याचे सांगितले जात आहे.
दोन तास झालेल्या या चर्चेत शिवडी, वरळी आणि माहिम या मतदारसंघासह इतर काही जागांबाबत चर्चा झाली आहे. आता महायुती आणि मनसे याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलंय. शिवडी मतदारसंघातून मनसे नेते बाळा नांदगावकर, वरळी तून संदीप देशपांडे, माहीम मतदारसंघातून राज यांचे चिरंजीव अमित ठाकरे निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे.
… तर मनसेचे नेते विधानसभेत दिसतील
विधानसभा निवडणुकीनंतर मनसेचे काही नेते विधानसभेत दिसतील. वेळप्रसंगी ते सत्तेत देखील असतील, असे राज ठाकरे यांनी जाहीर केले होते. त्यामुळे राज आणि महायुतीची चर्चा सकारात्मक झाली तर काही नेत्याना फायदा होईल, असे मनसेच्या मोठ्या नेत्याने खासगीत बोलताना सांगितले.