राजापूर शहरातील थकित मालमत्ता कर व पाणी पट्टी यांच्या वसुलीसाठी राजापूर नगर परिषदेने धडक मोहीम आखली असुन जे नागरिक थकित आहेत त्यांच्यावर धडक जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा राजापूर नगर परिषद प्रशासनाने दिला आहे. तर तोडण्यात आलेले नळ कनेक्शन परस्पर जोडुन पाण्याचा वापर करणाऱ्या नागरिकांकडुन पाच हजार रुपये दंड वसुलीचाही इशारा दिला आहे.
राजापूर शहरातील मिळकतधारक यांचे मालकिचे अथवा मिळकतीवरील संबंधित भोगवटदार यांची प्रलंबित मालमत्ता कर व पाणीपट्टी विषयक करांची रक्कम वसुली करण्यासाठी शासनाकडून प्राप्त सुचना व मार्गदर्शनानूसार सक्त उपाययोजना करण्यात येत असून याबाबत वसुलीपथके नेमून जप्ती सारखी कारवाई व नळसंयोजन बंद करणेची कार्यवाही सुरु करण्यात आली असल्याची माहिती राजापूर नगर परिषदेचे मुख्य लिपिक जितेंद्र जाधव यानी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
राजापूर नगर परिषदेच्या हद्दीतील व हद्दीबाहेरील ज्या नळधारकांनी पाणी पट्टी भरली नव्हती त्या नळ धारकांचे नळ कनेक्शन नगर परिषदेने तोडले होते. मात्र नगर परिषदेने कारवाई करुन बंद केल्यावर नळसंयोजन मिळकत धारक अथवा भोगवटधारक यांच्याकडून परस्पररित्या जोडले जात असल्याचे व अनधिकृतरित्या नगर परिषदेकडील पाण्याचा वापर करत असल्याचे नगर परिषदेच्या निदर्शनास आल्याची माहिती देण्यात आली आहे. या संदर्भात कारवाई करुन बंद केलेले नळ संयोजन परस्पररित्या सुरु केलेल्या नागरिकांकडून रक्कम रु.५०००/- इतकी दंडाची आकारणी या पथकांकडुन वसुल करण्याची तरतूद नगर परिषदेने केली असल्याची माहितीही यावेळी बोलताना मुख्य लिपिक जितेंद्र जाधव यानी दिली. तरीही जे नागरिक दंड अथवा कर भरणार नाहीत त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली.
त्यामुळे सर्व मिळकतधारक भोगवटधारक यांनी घरपट्टी, पाणीपट्टीच्या रक्कमा नगर परिषदेकडे विहीत वेळेत भरुन सहकार्य करावे व उपरोक्त प्रमाणे दंडात्मक कारवाईचे प्रसंग उद्भवणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे आवाहन नगर परिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.