वैष्णवीच्या अंगावर तब्बल 29 मारहाणीचे व्रण
पुणे : पुणे जिल्ह्यातील मुळशीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या सूनेने टोकाचे पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेवरुन राजकीय वर्तुळातही एकच चर्चा सुरु आहे. वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र ही आत्महत्या नसून, हत्या असल्याचा आरोपी तिच्या पालकांनी केला होता. याप्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठी कारवाई करण्यात आली असून, वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले.
वैष्णवी हगवणे या विवाहितेने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर हगवणे कुटुंबावर कारवाईचा फार्स आवळला जात असून, पोलिसांनी बुधवारी हुंड्यात दिलेली फॉर्च्यूनर कार आणि अॅक्टिव्हा गाडी जप्त केली आहे. पोलिसांनी मुळशीतील घरी जाऊन कारवाई केली. वैष्णवीला नेमका काय जाच झाला हे तिने एका मैत्रिणीकडे सांगितले होते, त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामध्ये, तिने सासरच्यांनी जाच केल्याचे म्हटले आहे. वैष्णवी यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात शवविच्छेदन झाले. या अहवालानुसार, तिच्या शरीरावर हात, पाय, मांडी आणि हनुवटीसह अनेक ठिकाणी मारहाणीच्या जखमा आणि रक्त साकळलेले डाग आढळले आहेत. या जखमांमुळे तिचा मृत्यू झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, राजकीय वरदहस्तातून हगवणे यांच्यावर कडक कारवाई केली जात नसल्याचा आरोप केला जात होता. याच आरोपांची गंभीर दखल घेत वैष्णवीचे सासरे आणि पुणे जिल्ह्यातील मुळशीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री पवारांकडून कारवाईच्या सूचना
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुणे पोलिस आयुक्तांशी बोलणे झाले आहे. त्यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. अजित पवार नेहमी दोषींवर कारवाई करा, असं म्हणतात, मग तो कोणत्याही पक्षाचा असो. याही प्रकरणात दोषींवर कारवाई होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी म्हटले आहे.