संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (फोटो - ट्विटर)
कौशल्याच्या माध्यमातून देशाला पुढे नेण्याची गरज
निर्मितीच माणसाचे महत्त्वाचे लक्षण – राजनाथ सिंह
केवळ ज्ञान उपयुक्त नसून त्याचे उपयोजन करण्याची कला अवगत असणे महत्त्वाचे
पुणे: आज जग वेगाने बदलत असून प्रत्येक क्षणाला नवा विचार, नवी व्यवस्था, नवे तंत्रज्ञान समोर येत असताना अशा अनिश्चित जगात आपले कौशल्य आपल्या मदतीला येऊ शकते. त्यामुळे सर्वांनी मिळून कौशल्याच्या माध्यमातून देशाला पुढे नेण्याची गरज आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून समर्थ आणि स्वावलंबी भारताच्या उभारणीसाठी केंद्र सरकारसोबत महाराष्ट्र राज्य शासन देखील कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या सुविधा उभ्या करीत आहे आणि त्यांना प्रोत्साहनही देण्यात येत आहे. सिम्बायोसिस विद्यापीठदेखील या दिशेने काम करत असून नोकरी मिळविण्यासाठी नाही तर नोकरी देण्याची क्षमता निर्माण करणारे शिक्षण येथे देण्यात येत आहे, असे गौरवोद्गार देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले.
कौशल्य शिक्षण देशाच्या उभारणीसाठी महत्त्वाचे असून कौशल्यप्राप्त व्यक्ती निर्मितीसाठी योगदान देतो. निर्मितीच माणसाचे महत्त्वाचे लक्षण असून निर्मितीत व्यस्त व्यक्तीच समाजाला दिशा देऊ शकते, असे नमूद करून संरक्षण मंत्री सिंह म्हणाले, आजच्या युगात केवळ ज्ञान उपयुक्त नसून त्याचे उपयोजन करण्याची कला अवगत असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे शिकलेल्या बाबींना जीवनात कसे आणावे हे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे हेच आजच्या शिक्षणाचे उद्दिष्ट असायला हवे.
Empowering Defence Innovation: Convocation and Inauguration of the School of Defence & Aerospace Technology of Symbiosis Skills & Professional University Attended the 6th convocation ceremony of Symbiosis Skills and Professional University, Pune, along with Hon Raksha Mantri… https://t.co/XazN7k1812 pic.twitter.com/IrXYcD6b7y — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 16, 2025
नवभारताकडे देश जात असताना स्कील इंडीया, स्टार्ट अप इंडिया आणि मेक इन इंडियावर भर देण्यात येत आहे. केंद्र सरकारने कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले आहे. या मंत्रालयाने या क्षेत्रातील आव्हानांना संधीत रुपांतरीत करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत १ कोटी ६३ लाख उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे.
जनशिक्षा संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण, आदिवासी आणि दुर्लक्षित घटकातील ३० लाखापेक्षा अधिक उमेदवारांना शिलाई, भरतकाम, हस्तकला, फळ प्रक्रिया आणि आरोग्य सेवा सहायकाचे प्रशिक्षण करण्यात आले आहे. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत देशातील पारंपरिक कारागिरांना सक्षम करण्यात येत असून २२ लाख कारागिरांना व्यवसायाची आधुनिक साधने प्रदान करण्यात आली आहेत. यामुळे देशात कौशल्य विकासाला अनुकुल वातावरण तयार झाले आहे.
देशातील युवकांकडे कौशल्य असेल तर जगातील कोणतीच शक्ती आपल्याला रोखू शकत नाही. देशात कौशल्य विकास क्षेत्रातील प्रगती लक्षात घेता आजची पिढी कौशल्य प्राप्त करून पुढच्या युगातील तंत्रज्ञानाची पिढी घडवेल, असा विश्वास वाटतो. मात्र कौशल्यासोबत संवेदनशील राहून समाजासाठी त्याचा उपयोग करणे आवश्यक आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले.