सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : विधानसभा निवडणुक लवकरच होणार आहे, या पार्श्वभूमीवर अनेक नेते, कार्यकर्ते पक्ष बदलतांना दिसून येत आहे, पुण्यातील पर्वती मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक पार पडली. यावेळी भाजप आणि कॉंग्रेसमधील अनेक कार्यकर्त्यांनी रासपमध्ये प्रवेश केला. धनकवडी येथे पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. रासपचे पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी रासपमध्ये प्रवेश केला. यावेळी पर्वती विधानसभा अध्यक्षपदी अक्षय खर्डेकर यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांनी पुण्यातील ८ मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्ष निवडणूक लढविणार असा दावा केला आहे.
बालाजी पवार काय म्हणाले?
पुण्यात रासपची मोठी ताकद आहे, पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाने अनेक कामे केली आहेत, त्यामुळे आमचे सर्व उमेदवार निवडून येतील, असा विश्वास रासपचे पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांनी व्यक्त केला. तसेच मी खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छूक आहे, महादेव जानकर यांनीही तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. खडकवासला मतदारसंघात रासपची मोठी ताकद आहे. ओबीसी, धनगर समाज तसेच महादेव जानकर यांना मानणारा मोठा गरीब मराठा वर्ग आहे.
वर्धापनदिनी जानकर काय म्हणाले होते?
आम्ही महायुतीत आहे की नाही, हेच माहीत नाही, त्यामुळे प्रत्येकाने आपापली तयारी केली पाहिजेत म्हणून आम्ही येत्या विधानसभेला महाराष्ट्रातील 288 जागा लढविणार असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिली होती. राष्ट्रीय समाज पक्षाचा अकोला येथे वर्धापन दिन झाला. त्यात प्रदेशाध्यक्षांनी याबाबतचा निर्णय जाहीर केला.
किती दिवस एखाद्याच्या आश्रयाखाली राहायचं?
प्रत्येकानं आपापली तयारी केली पाहिजे. रडल्याशिवाय आई सुद्धा दूध पाजत नाही. आपण किती दिवस एखाद्याच्या आश्रयाखाली राहायचं? त्यापेक्षा आपली आपली तयारी केली पाहिजे, असंही महादेव जानकर म्हणाले होते. त्यामुळे रासप महायुतीत राहणार की नाही हे येत्या काही दिवसातचं स्पष्ट होईल.