पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहात सापडलेल्या गांजा प्रकरणी कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आक्रमक झाले आहेत. या दोन्ही नेत्यांनी पुणे विद्यापीठ प्रशासनाची भेट घेतली. गांजा प्रकरणी १४ दिवसांपासून हे प्रकरण का दाबण्यात आले असा खडा संवाद त्यांनी केला. गांजा प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी ही त्यांनी यावेळी केली.
लायटिंगच्या नावाखाली दोन कोटी रुपये आणले
यावेळी माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, विद्यापीठ प्रशासनाशी एकूण पाच मुद्द्यावर चर्चा केली. G-२० च्या काळात विद्यापीठामध्ये लायटिंगच्या नावाखाली दोन कोटी रुपये आणले होते. रस्त्याच्या नावाखाली वेगळा फंड खर्च केला. मात्र, काम तितक्या दर्ज्याचे झाले नाही. विद्यापीठातील जेवणाचा दर्जा, राहण्याची व्यवस्था, बांडगुळ ( पॅरासाईट) विद्यार्थी, सिनेट मेंबर रोहित पवार विद्यापीठात आले असताना त्यांना एनएसयूआय आणि एसएफआयच्या विद्यार्थी प्रतिनिधी भेटायला गेले होते. कारण या विद्यार्थिनींना येथे अभाविप संघटनेकडून मारहाण झाली होती. ज्यांना मारहाण झाली त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते.
त्यावर जोरदार आक्षेप
त्या विद्यार्थिनींनाही आज या चर्चेसाठी बोलावलं होते. यावर रजिस्टर असणाऱ्या खरे यांनी नक्षलवादी संघटना शब्द वापरला. त्यावर जोरदार आक्षेप घेतला. विद्यापीठात गांजा सापडतो कोणालाच कळत नाही. याची जबाबदारी कोणाची. तेरा दिवस होऊनही गुन्हा दाखल झाला नाही. प्रशासन म्हणाले काल प्रक्रिया सुरू केली.
तेरा दिवस विचार प्रक्रिया
या प्रक्रियेला एवढा वेळ लागला ही प्रक्रिया कोणती आहे हे समजले पाहिजे. कारण जर समजा एकदा विद्यापीठात खून, बलात्कार यासारखा अनुचित प्रकार घडल्यास त्यासाठी तेरा दिवस विचार प्रक्रिया करत बसतील का ? याबाबत चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की गांजा प्रकरण आम्हाला आजच माहिती झाले आहे.
येत्या अधिवेशनामध्ये त्यावर चर्चा घडवून आणावी
विद्यापीठाने या प्रकरणात गुन्हा दाखल होईल हे मान्य केले आहे. परंतु हे प्रकरण लपवण्यासाठी ज्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले असतील त्यांच्या निलंबनासाठी आणि त्यांच्या वरती वेगळी चौकशी करावी. अन्यथा येत्या अधिवेशनामध्ये त्यावर चर्चा घडवून आणावी लागेल. विद्यापीठ प्रशासन जोपर्यंत कळवत नाही तोपर्यंत पोलिसांना इथले काहीही माहिती नसते विद्यापीठांमध्ये पारदर्शकता असायला हवी असे अंधारे म्हणाल्या.
आमच्या संघटना सातत्याने त्यांची बाजू मांडतात
रवींद्र धंगेकर म्हणाले, ‘विद्यापीठांमध्ये वादग्रस्त विषय होतात त्यामध्ये आमच्या संघटना सातत्याने त्यांची बाजू मांडतात. या पाच मुद्द्यांमध्ये मी ही सामील होतो. विद्यापीठांमधील भ्रष्टाचार, आमच्या संघटनावर खोट्या केस, गांजा सापडणे, त्याची चौकशी केली जात नाही. त्यावर लवकरच गुन्हा दाखल करावेत. ज्या विद्यार्थ्यांवर खोट्या केसेस कुलगुरूमार्फत झाले आहेत यामध्ये सुधारणा न झाल्यास आम्ही आहोत. कुलगुरूंच्या बैठकीत पोलीस होते मी त्यांना विनंती केली आहे जर गांजा सापडला असेल तर यामध्ये कारवाई केली पाहिजे. भ्रष्टाचार झाला असेल तर कारवाई करावी.