पंढरपूर : पंढरपूर येथे महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते पंढरपूर येथे श्री. विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात आज पहाटे नित्यपूजा करण्यात आली. याप्रसंगी त्यांच्या सोबत त्यांच्या भगिनी आणि स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी उपस्थित होत्या.
श्री. विठ्ठलाच्या पूजेवेळी अनुसया फसळकर यांनी म्हटलेला काकडा डॉ. गोऱ्हे यांना प्रचंड भावला. शक्य असल्यास मंदिर प्रशासनाने या काकड्याचे शब्दांकन करावे, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. घरामध्ये पिढ्यानपिढ्या श्रावण महिन्यात पंढरपूरच्या श्री. विठ्ठलाची पूजा करण्याची प्रथा सुरू आहे. त्यानिमित्ताने विठ्ठलाची सेवा करण्याचा लाभ मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात दुष्काळाची छाया गडद होत चालली आहे. हे संकट दूर व्हावे आणि पाऊस पडावा म्हणून विठ्ठलाकडे प्रार्थना केली असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
याप्रसंगी, श्री. विठ्ठल मंदिर प्रशासनाच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा विठ्ठलरुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार केला. यावेळी विठ्ठल मंदिरातील नित्योपचार विभाग प्रमुख संजय कोकीळ आणि कर्मचारी उपस्थित होते.
Web Title: Remove the drought crisis in ba vitthala state dr neelam gorhe nrab