पुणे / अक्षय फाटक : पुण्यातील बहुचर्चित व गुन्हेगारीचे (Pune Crime) माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दत्तवाडी पोलीस ठाण्याचे (Dattawadi Police Station) अखेर नामकरण झाले आहे. आता यापुढे पर्वती पोलीस ठाणे (Parvati Police Station) असे नाव असणार आहे. शासनाने याबाबत आदेश नुकतेच पारित केले असून, लक्ष्मीनगर रहिवाशी संघाने नामकरणासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे. पर्वती टेकडीचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्व विचारात घेऊन शासनाने हा निर्णय घेतला आहे.
शहर पोलीस दलातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाच्या पोलीस ठाण्यांपैकी दत्तवाडी हे एक पोलीस ठाणे मानले जाते. सर्वाधिक मोठी झोपडपट्टी जनता वसाहत या पोलीस ठाण्याअंतर्गत येते. गुन्हेगारीचे माहेर घर म्हणून पोलीस ठाण्यास ओळखले जात असत. परंतु, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून या पोलीस ठाण्याने गुन्हेगारीच्या बाबतीत शांतता निर्माण केली आहे. तत्पूर्वी 2008 साली हे पोलीस ठाणे सुरू झाले. स्वारगेट पोलीस ठाण्याची व्याप्ती आणि वाढते गुन्हे लक्षात घेऊन स्वारगेट पोलीस ठाण्याचे विभाजन करुन दत्तवाडी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. चार पोलीस चौकींचा परिसर असलेल्या या ठाण्यात 12 अधिकारी व 87 पोलीस अंमलदार कार्यरत आहेत.
दत्तवाडी पोलीस ठाणे झाल्यानंतर मात्र, दत्तवाडी पोलीस चौकी व दत्तवाडी पोलीस ठाणे या नामसार्धम्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असत. त्यांचा या नावाला विरोध होता. लक्ष्मीनगर रहिवाशी संघाने पोलीस ठाणे, पोलीस आयुक्तालय व प्रशासनाला याबाबतचे निवेदन दिले. पर्वती परिसरात हे ठाणे असताना त्याचे नाव दत्तवाडी ठेवण्यात आले होते. त्यासोबतच दत्तवाडी म्हंटल की अनेकजन दत्तवाडी पोलीस चौकीला जात असत. तसेच, घटना पर्वती, लक्ष्मीनगर, जनता वसाहत वा इतर ठिकाणी घडली तरीही दत्तवाडीत घडली असे होत. त्यामुळे दत्तवाडीचे रहिवाशी देखील यामुळे नाराज होते. विनाकारण बदनामी होते.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून याबाबतचा पत्र व्यवहार प्रशासन व गृहविभागाकडे केला जात होता. दत्तवाडी पोलीस ठाण्याचे नाव बदलून पर्वती पोलीस ठाणे करण्याची विनंती केली. त्याअनुषंगाने शासनाने दत्तवाडीचे पर्वती पोलीस ठाणे असे नामकरण केले आहे.
पर्वती पोलीस ठाणे
दत्तवाडी पोलीस ठाणे पर्वती परिसरात तर आहेच पण, ते पर्वतीच्या पायथ्याला आहे. ऐतिहासिक पर्वती टेकडी व मंदिर यामुळे त्याचे नाव पर्वती असेच असावे, अशी आग्रही मागणी होती. सर्व पोलीस ठाणी हे त्या-त्या परिसराच्या नावाने ओळखले जातात व त्यांची नावेही तशीच आहेत. केवळ हेच ठाणे वेगळ्या नावाने होते.
‘नवराष्ट्र’ने दिली होती पहिली बातमी..!
लक्ष्मीनगर रहिवाशी संघाने पत्रव्यवहार सुरू केल्यानंतर ‘नवराष्ट्र’ वृत्तपत्राने त्यांच्या या मागणीला प्रसिद्धी दिली होती. तर या मागणीला देखील पाठिंबा दर्शवला होता. 17 जानेवारी 2022 मध्ये याबाबतची पहिली बातमी देत दत्तवाडी पोलीस ठाण्याचे नाव बदलणार या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.