सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचे विक्री होत आहे. या अमली पदार्थांच्या विळख्यात जिल्ह्यातील शाळा कॉलेजमधील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अडकत चालले आहेत. त्यामुळे रोटरी क्लब ऑफ सेंट्रल सिंधुदुर्गच्या माध्यमातून १५ जून पासून जिल्ह्यातील प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना अमली पदार्थांपासून दूर राहण्यासाठी व सिंधुदुर्ग जिल्हा अमली पदार्थ मुक्त होण्यासाठी जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती सल्लागार डॉ. अनिल नेरुरकर यांनी दिली.
येथील संजीवनी हॉस्पिटल येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी रोटरी क्लब असिस्टंट गव्हर्नर महादेव पाटकर, राजन बोभाटे, डॉ. विद्याधर तायशेट्ये, डॉ. सुहास पावसकर, समुपदेशक मंजिरी घेवारी उपस्थित होत्या. डॉ. नेरुरकर म्हणाले, जिल्हा तंबाखू मुक्त होण्यासाठी गेली पंधरा वर्षे मी काम करत असून यामध्ये ३० ते ३५ कॅम्प घेण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यात अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांची संख्या वाढत चालली असून यामध्ये सर्वाधिक संख्या ही शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांची आहे. या अमली पदार्थांचे शेवट गोव्यात मोठ्या प्रमाणात होत होते मात्र सध्या याच्या प्रसार कोकणातही होत आहे. हे अमली पदार्थ विद्यार्थ्यांना सर्रासपणे उपलब्ध करून दिले जात आहे. अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यामध्ये मुलींची संख्या ही सर्वाधिक आहे. त्यामुळे अमली पदार्थांपासून दूर राहण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. अमली पदार्थांमध्ये गांजा अफू हे नैसर्गिक रित्या तयार होतात. मात्र काही कंपन्या सध्या नवनवीन ड्रग्सच्या प्रकारांचे शोध लावत आहेत. त्यामध्ये टॅबलेट व इंजेक्शनद्वारे घेण्यात येणारा ड्रग्सचाही समावेश आहे. त्यामुळे या अमली पदार्थांच्या विख्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांचे समुपदेशन होणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही जिल्ह्यातील प्रत्येक शाळा व कॉलेजमध्ये जाऊन अमली पदार्थ विरोधात जनजागृती करणार आहोत असे डॉक्टर नेरुरकर यांनी सांगितले.
मंजिरी घेवारी म्हणाल्या, अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या मुलांचे समुपदेशन करणे महत्त्वाचे आहे. त्यांनी अमली पदार्थ घेण्यास कधीपासून सुरुवात केली? त्याचे नेमके कारण काय? त्यांना ते पदार्थ कुठून पुरवले जातात? सर्व माहिती घेऊन त्यांची समुपदेशन करायला हवे. वाईट संगत, प्रेम भंग किंवा अन्य कारणे शोध घेण्याची गरज आहे. त्या मुलाचे मित्र किंवा त्यांचे सहकारी कोण? शोधणे महत्वाचे आहे. आई वडिलांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार देण्याची गरज आहे. ही मुले नशेच्या आहारी जाऊन वैफल्य होत आहेत असे त्यांनी सांगितले.