मुंबई : आज पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी भिडेंच्या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरले. कॉंग्रेसने जोरदार विरोध प्रदर्शन करीत संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कारवाई होणार परंतु त्याचबरोबर कॉंग्रेसचे मुखपत्र असलेल्या शिदोरीतून सावरकरांवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यावरसुद्धा कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. यावेळी विरोधकांनी संभाजी भिडेंचा उल्लेख करताना गुरुजी असा केल्याने, यावर कॉंग्रेसने जोरदार आक्षेप घेतला त्यामुळे काही वेळ सभागृहात जोरदार घोषणाबाजी झाल्याने गोंधळ उडाला.
महाराष्ट्रासह देशभरातून संतापाची लाट
महात्मा गांधीबाबत संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्रासह देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, संभाजी भिडेंवर कारवाई व्हावी यासाठी काँग्रेसने राज्यभर आंदोलन करीत आहे. दरम्यान, आता भिडेंच्या कारवाईसाठी काँग्रेस आक्रमक झाली असून, आज विधीमंडळ अधिवेशनात बोलताना, “संभाजी भिडे जिथे असेल तिथून त्याला अटक करा”, अशी मागणी काँग्रेस आमदार व विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी केली आहे.
काँग्रेस पक्षाची भिडेंवर कारवाई करण्याची जोरदार मागणी
मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे हा व्यक्ती राजरोस महापुरुषांचा अपमान करीत आहेत. परंतु, भाजपचे सरकार त्यावर कारवाई करीत नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतीबा फुले, सावित्रीबाई फुले, साईबाबा यांच्यासंदर्भात गरळ ओकणारा भिडे नावाचा इसम अजून मोकाटच आहे. महापुरुषांचा अपमान करण्याचे लायसन्स भाजपने संभाजी भिडेला दिले आहे का? असा संतप्त सवाल करीत भिडेंवर कारवाई करण्याच्या मागणीवर काँग्रेस पक्ष ठाम आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.