फोटो - सोशल मीडिया
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणूकीची तयारी सुरु झाली आहे. भाजपकडून महाअधिवेशन घेण्यात आले असून अमित शाह यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सर्व नेत्यांनी जोरदार भाषण केली. आगामी निवडणूकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी ही भाषण लक्षवेधी देखील ठरली. तुफान राजकीय फटकेबाजी करत पुन्हा महायुतीचं सरकार येणार असा विश्वास देखील देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मात्र या सभेतील विधानांवर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. दंगली घडवायच्या आहेत का असा सवाल संभाजी ब्रिगेडने उपस्थित केला आहे.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील भाजपच्या महाअधिवेशनामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यांच्यामध्ये निवडणूकीच्या प्रचारासाठी उत्साह निर्माण करत विजयाचा विश्वास देखील व्यक्त केला. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्या पक्षाचे लोक बोलत नाहीत. वरुन पक्षाकडून आदेश येण्याची वाट पाहतात. आदेश आला तरच बोलणार असे पदाधिकारी व कार्यकर्ते करत आहेत. यापुढे मी तुम्हाला पूर्ण परवानगी देतो. ज्याला बॅटिंग करायची आहे, त्याने करा. मैदानात उतरा. पण अट एकच आहे. हीट विकेट व्हायचं नाही. जे फुटबॉल खेळतात त्यांना माहिती आहे सेल्फ गोल करायचा नाही. काही लोक बोलायला उतरले की समोरच्यावर बोलायच्या ऐवजी आपल्यावरच बोलून जातात. ते असं काही बोलतात की चार दिवस त्याचीच उत्तरं द्यावी लागतात. बाकी आदेश विचारू नका. मैदानात उतरा आणि ठोकून काढा. तुम्हाला खोटं बोलायचंच नाही. खरं बोलायला विचार करावा लागत नाही. त्यांना खोटं बोलायचं आहे. तुम्हाला खरं बोलायचं आहे. तुम्ही सगळे मैदानात उतरले पाहिजेत, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यावर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे.
संभाजी ब्रिगेडकडून जोरदार प्रत्युत्तर
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यांनी फडणवीसांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. प्रवक्ते संतोष शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत म्हणाले की, “माझ्या आदेशाची वाट पाहू नका? डायरेक्ट ठोकून काढा? ही देवेंद्र फडणवीस यांची भाषा गृहमंत्री पदाला शोभणारी नाही. कदाचित राज्याच्या गृहमंत्र्याला महाराष्ट्रात भाजपची सत्ता आणायची आहे? त्यासाठी दंगली घडविल्याशिवाय पर्याय नाही किंवा वाद घातल्याशिवाय पर्याय नाही असेच या वक्तव्यावरून कळतं. म्हणजे जे जे सरकारवर किंवा फडणवीसांवर टीका करतात त्यांना कदाचित फोडून काढण्याची भाषा देवेंद्र फडणवीस यांची असेल हे अत्यंत दुर्दैवी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना हे मान्य आहे का? मी, देवेंद्र फडणवीस यांना सुसंस्कृत नेता समजत होतो. तो शब्द त्यांनी चक्क पुसून काढला. ‘ठोकून काढा’ म्हणणे म्हणजे गुंडगिरी दादागिरीला प्रोत्साहन देण्यासारखे आहे. महाराष्ट्राच काय होईल हे आता सांगता येणार नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या वक्तव्याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर निषेध” असा शब्दांत संतोष शिंदे यांनी रोष व्यक्त केला आहे.