फोटो - सोशल मीडिया
सांगोला: राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यापूर्वी राज्याचे राजकारण रंगले आहे. निवडणूक आयोगाने अद्याप निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केलेला नाही. त्यापूर्वीच सर्व पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. सभा दौरे यांच्यामाध्यमांतून लोकांसमोर प्रचार केला जात आहे. त्याचबरोबर बंद दाराआड चर्चा आणि भेटीगाठी यामधून अंतर्गत राजकारण देखील सुरु आहे. यामुळे निवडणूकीच्या पूर्वी नेत्यांचे पक्षांतर देखील वाढले आहे. यामध्ये जेष्ठ नेते शरद पवार हेच किंगमेकर म्हणून भूमिका बजावत आहेत.
शरद पवार यांच्या गटामध्ये अनेक नेत्यांचे इनकमिंग सध्या सुरु आहेत. महायुतीला मोठे धक्के देत अनेक नेत्यांचा पक्षप्रवेश सुरु आहे. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे, समरजीतसिंह घाटगे यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणामध्ये मोठे बदल झाले आहे. त्यामुळे शरद पवार यांनी आधीच महायुतीला झटका दिला आहे. त्यानंतर आता शरद पवार यांनी आणखी एक डाव टाकला आहे. यामुळे अजित पवार गट व शिंदे गट यांना मोठा धक्का बसला आहे. कोल्हापूरनंतर आता सोलापूरमध्ये शरद पवार यांनी राजकारण खेळले आहे.
अजित पवार गटाला दोन नेत्यांचे पक्षांतर
विधानसभा निवडणूकीच्या आधी सोलापूरमध्ये राजकारण रंगले आहे. महायुतीचे दोन नेते शरद पवार गटामध्ये दाखल होणार आहेत. सोलापूरच्या टेभुर्णीत आमदार बबनराव शिंदेंना विजयसिंह मोहिते पाटलांनी मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दोन नेत्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत देशमुख बंधूंनी शरद पवार गटात पक्ष प्रवेश केला आहे. जयंत पाटलांच्या उपस्थितीत टेभुर्णीच्या सुरज देशमुख आणि रावसाहेब देशमुख या बंधूंनी शरद पवार गटात पक्ष प्रवेश केला आहे. विजयसिंह मोहिते पाटलांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश झाला आहे. त्यामुळे राजकारणामध्ये शरद पवार हे खऱ्या अर्थाने ‘श्रेष्ठ’ ठरत आहेत.
शिंदे गटाला धक्का
त्याचबरोबर शरद पवार यांनी शिंदे गटाला देखील मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख डी. एस. सावंत यांनी शिंदे गटाला राम राम ठोकला आहे. त्यामुळे शरद पवार गटाने शिवसेना शिंदे गटाला सोलापूर जिल्हात पहिला झटका बसला आहे. आमदार शहाजी बापू पाटलांच्या चुकीच्या कार्य पद्धतीमुळे पक्ष सोडला आहे, असा गंभीर आरोप डी. एस. सावंतांनी केला आहे. राज्याचे नेतृत्व जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगले असले तरी जिल्हातले पदाधिकारी, आमदार यांचे वागणे बरोबर नसल्याचे म्हणत उपजिल्हा प्रमुख डी. एस. सावंत यांनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे.
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि त्यांचा पक्ष सक्रीय झाला आहे. याआधी देखील अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या निलेश लंके यांना निवडणूकीच्या आधी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. यानंतर लोकसभेमध्ये त्यांचा मोठा विजय झाला. यानंतर आता शरद पवार गटाने विधानसभेच्या पार्श्वभूमीवर देखील मोठी चाल खेळली आहे. शरद पवार गटाने अजित पवार गट व शिंदे गटाला धक्का दिला आहे.