बावडा: इंदापूर तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेसह श्रावण बाळ योजनेचेही अनुदान तीन महिने रखडल्याने लाभार्थ्यांवर ऐन सनासुदीची बिकट वेळ आली आहे.
येथील प्रहार अपंग संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली खंडोबानगर (बावडा) येथे लाभार्थ्यांची आज बैठक पार पडली. त्यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले, शासन मोठमोठ्या प्रकल्पावर करोडो रुपये खर्च करत आहे. ही अभिमानास्पद बाब आहे. परंतु निराधार जनतेकडे मात्र शासनाने पाठ फिरवल्याने अक्षरशा उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत तहसील विभागाकडे चौकशी केली असता. वरिष्ठ पातळीवरूनच अनुदान प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात येते. येत्या आठ दिवसात लाभार्थ्यांना अनुदान न दिल्यास इंदापूर तहसील कार्यालय (संजय गांधी योजना) समोर बेमुदत उपोषणास व घंटानाद आंदोलन करण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला. या बैठकीस संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख अण्णासाहेब तोरणे, ज्येष्ठ कार्यकर्ते भिमराव कांबळे यांच्यासह वंचित लाभार्थी उपस्थित होते. त्यामध्ये महिलांचा ही समावेश होता. यासंदर्भात माजी सहकार मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.
Web Title: Sanjay gandhi niradhar yojana grant stalled for three month deep discontent among beneficiaries