एस. जयशंकर SCO Summit साठी पोहोचले मॉस्कोला, Putin यांचीही घेतली भेट ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
S. Jaishankar in Russia : मॉस्कोमध्ये झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन(Vladimir Putin) यांची महत्वाची भेट घेतली. दोन्ही देशांसाठी रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या काळात झालेली ही बैठक भारत-रशिया संबंधांना नवी दिशा देणारी मानली जाते. जयशंकर यांच्या या दौऱ्याकडे जगभरातील कूटनीतिज्ञांचे लक्ष लागले आहे, कारण यावर्षाच्या अखेरीस पुतिन भारत भेटीवर येणार आहेत. परस्पर सहकार, सुरक्षा, प्रादेशिक स्थिती, तसेच जागतिक घडामोडींवर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली.
मंगळवारी (18 नोव्हेंबर 2025) मॉस्कोमध्ये झालेल्या भेटीत जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छा पुतिन यांच्यापर्यंत पोहोचवल्या. त्यांनी पुतिन यांना 2025 च्या वार्षिक भारत-रशिया शिखर परिषदेच्या तयारीबद्दल सविस्तर माहिती दिली.
स्वतः जयशंकर यांनी सोशल मीडियावर लिहिले की,
“राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना भेटून मला सन्मान वाटतो. आमच्या वार्षिक शिखर परिषदेची तयारी, जागतिक-प्रादेशिक घडामोडी आणि द्विपक्षीय संबंध वाढविण्यासंबंधी चर्चा झाली. त्यांच्या मार्गदर्शनाचा आम्हाला नेहमीच लाभ होतो.”
या बैठकीत भारतीय राजदूत विनय कुमार आणि सहसचिव मयंक सिंग हेही उपस्थित होते. क्रेमलिनमध्ये पुतिन यांनी जयशंकर यांचे उबदार स्वागत केले आणि दोन्ही देशांमधील सद्य स्थितीची माहिती घेऊन आगामी सहकार्याबाबत सकारात्मक संकेत दिले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Two Front War : ’88 तासांचे ट्रेलर पुरेसे’,भारताकडून पाकिस्तानला कठोर इशारा; ख्वाजा आसिफला सतावतेय नेमकी कशाची भीती?
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात भारताच्या अधिकृत दौर्यावर येणार असल्याची अपेक्षा आहे. ५ डिसेंबरच्या आसपास होणारा हा दौरा दोन्ही देशांमधील धोरणात्मक सहकार, संरक्षण, ऊर्जा, व्यापार आणि विविध प्रकल्पांच्या गतीकरणासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
मॉस्को दौऱ्यादरम्यान जयशंकर यांनी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्याशी दीर्घ चर्चा केली. संरक्षण, ऊर्जा, व्यापार आणि बहुपक्षीय सहकार्य यावर दोघांनी विचारविनिमय केला. भारत आणि रशिया हे दशकानुदशकांचे विश्वसनीय भागीदार असून, या बैठकीमुळे दोन्ही देशांनी सहकार्याची नवी रूपरेषा आखल्याचे संकेत मिळत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Saudi deal: व्हाईट हाऊसमध्ये ऐतिहासिक करार; ट्रम्प यांनी क्राउन प्रिन्सची ‘दूरगामी’ रणनीती, F-35 च्या विक्रीला मान्यता
एससीओच्या बैठकीत पुतिन यांच्यासोबत कझाकस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, बेलारूस, इराण आणि पाकिस्तानचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत प्रादेशिक सहकार्य, दहशतवादाविरुद्ध लढा, आर्थिक भागीदारी यांसारख्या प्रमुख विषयांवर चर्चा झाली. याशिवाय जयशंकर यांनी मंगोलियाचे पंतप्रधान गोम्बोजाविन झंदनशतर आणि कतारचे पंतप्रधान व परराष्ट्र मंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल सानी यांचीही स्वतंत्र भेट घेतली. रशियाचे पंतप्रधान मिशुस्टिन यांच्या आदरातिथ्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या संपूर्ण दौऱ्याने भारत-रशिया संबंध पुन्हा एकदा बळकट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जागतिक राजकारणातील बदलत्या समीकरणांत दोन्ही देश परस्पर सहकार्य वाढविण्यावर भर देत आहेत.






