वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करणार, संजय जांभळे यांचा इशारा
पेण तालुक्यातील ग्रामीण भागातील कासु, पांढापूर, गडब, डोळवी, वडखळ, बोरी, शिर्की, मसद, कांदले, उचेडा, हमरापूर विभाग, पूर्व विभाग व पेण शहरात विजेचा लपंडाव सुरु आहे. गेली आठ-दहा दिवस विज खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. याला सर्वस्वी जबाबदार महावितरण कंपनीचे अधिकारी असून येत्या आठ दिवसात वीज पुरवठा पूर्ववत न झाल्यास तिव्र आंदोलन करण्यात येईल. त्याची पूर्ण जबाबदारी वीज वितरण अधिकारी यांची असेल. असा इशारा माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.
गेली आठ दिवस पेण तालुक्यातील ग्रामीण भागासह पेण शहरातील विजेच्या तारा बदलणे, पोल बदलणे हे काम सुरु आहे. याचा परिणाम म्हणून, लहान-मोठे उद्योगधंदे आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे. या बाबत जनमानसात संतापाची लाट पसरली असून त्याबाबत माहिती देण्यासाठी संजय जांभळे यांनी पत्रकार परिषद घेतली.
पेण तालुक्यातील वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त आहेत. शहरातील आणि ग्रामीण भागातील लोकांना वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. विजेच्या खेळखंडोब्याबाबत एकही लोकप्रतिनिधी आवाज उठवत नाही. जनता त्रस्त झाली आहे. यासाठी कोणाकडे जावे हा प्रश्न पडला आहे. महावितरणची अनास्था: हे याचे मोठे कारण असून अधिकारी व कर्मचारी वर्गाला माज आला असल्याचे संजय जांभळे यांनी बोलताना सांगितले. खरं पाहता ठेकेदाराचे भले व्हावे म्हणून अधिकारी नागरिकांना वेठीस धरुन दिवसभरात चार ते पाच तास लाईट बंद करत आहेत अशी चर्चा सुरू आहे. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर वीजपुरवठा खंडित करण्यामागे त्यांचा निष्काळजीपणा असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला.
गरज नसतानाही दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा वारंवार खंडित केला जात आहे, ज्यामुळे नागरिकांना गैरसोय होत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे घरांचे, शाळांचे आणि अंगणवाड्यांचे पत्रे उडून गेले आहेत, तसेच वीज खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणीही संजय जांभळे यांनी केली आहे.