संजय निरुपम यांचा चांदिवाला एंटरप्रायझेसवर आरोप (फोटो- सोशल मीडिया)
मुंबई: मुंबईतील चांदिवाला एंटरप्रायझेसकडून या विकासकाकडून जोगेश्वरीतील दोन पुनर्विकास प्रकल्पांमध्ये ६६० कोटींचा घोटाळा केला आहे. या प्रकल्पातील २२० फ्लॅट अनधिकृतपणे तयार केले असून त्यांची विक्री मुस्लिम व्यक्तींना केल्याचा गंभीर आरोप शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज केला. या विकासकाकडून झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात हाउसिंग जिहादच्या माध्यमातून मुंबईचा सामाजिक समतोल बिघडवण्याचे षडयंत्र केले जात असल्याचा आरोप निरुपम यांनी केला. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत निरुपम बोलत होते.
निरुपम पुढे म्हणाले की, चांदिवाला बिल्डरविरोधात राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांना तक्रार केली असून चौकशी सुरु आहे. चौकशी समितीला या प्रकल्पांमध्ये हाउसिंग जिहादसारखा प्रकार आढळून आला असल्याचे निरुपम म्हणाले. लवकरच या प्रकरणी अंतिम चौकशी अहवाल तयार होईल, असे ते म्हणाले. खोट्या कागदपत्रांच्या आधारे चांदिवाला बिल्डर्स सरकारकडून एफएसआय घेतला. यात किमान ६६० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप निरुपम यांनी केला.
या कट कारस्थानात आणखी कोण कोण सहभागी आहेत याचीही चौकशी व्हावी अशी मागणी निरुपम यांनी केली. चांदिवाला बिल्डर प्रमाणेच मुंबईतील आणखी २० ते २५ बिल्डर्स आहेत जे मराठी माणसांची घरे विकत घेतात आणि पुनर्विकासात ती घरे मुस्लिमांना विकतात, असा आरोप निरुपम यांनी केला. हे रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अशा प्रकारच्या प्रकल्पांची छाननी केली पाहिजे. ज्या मराठी माणसांची घरे बिल्डरने लाटली आहेत ती त्यांना परत देण्याबाबत सरकारने कारवाई करायला हवी, असे ते म्हणाले.