विद्यार्थ्यांसाठी समाज संघटना वसतिगृह आणि स्पर्धा परीक्षासाठी अभ्यासिका उभारण्याचा संकल्प- संजय पाटील
संतोष पेरणे, कर्जत : कर्जत तालुक्यातील आगरी समाजातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी समाज संघटना वसतिगृह आणि स्पर्धा परीक्षासाठी अभ्यासिका उभारण्याचा संकल्प केला आहे. याकार्यासाठी आगरी समाजाचे नेते सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे खासदार संजय पाटील यांनी जाहीर केले. तर कर्जत तालुक्याच्या आगरी समाज हॉलचे सुशोभीकरणासाठी दहा लाखाचा निधी कामगार नेते राष्ट्रीय इंटक अध्यक्ष महेंद्र घरत यांनी जाहीर केले. दरम्यान,आगरी समाजातील दहावी बारावी मधील गुणवंत 160 विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळ्यात मान्यवर उपस्थित होते.
नेरळ येथील धामोते कोल्हारे येथे आलेल्या हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृह येथे आयोजीत करण्यात आला होता. यावेळी सुरुवातीला विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन महाराष्ट्र कौशल्य विकास आणि उद्योजकता विकास विभागाचे जनसंपर्क अधिकारी प्रा.नवीन भोपी यांनी मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाची सुरुवात हुतात्मा हिराजी पाटील यांच्या अर्ध पुतळ्याला खासदार संजय पाटील यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. तर दीप प्रज्वलन तसेच छत्रपती शिवाजी महाराज, सरस्वती देवी आणि गणेश मूर्तीचे पूजन मान्यवरांचे हस्ते झाले.कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे वतीने आगरी समाज हॉलमध्ये बसवण्यात आलेल्या आई एकविरा आणि कुलदैवत खंडेराय यांच्या प्रतिमांचे अनावरण कामगार नेते महेंद्र घरत आणि जयेंद्र खुणे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
यावेळी सूर नवा ध्यास नवा फेम गायक भावेश खाडे यांनी स्वागत गीत सादर केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे सचिव जितेंद्र गवळी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष संतोष पेरणे यांनी करताना आगरी समाजातील मुलांसाठी वसतिगृह आणि स्पर्धा परीक्षा अभ्यासिका उभारण्याचे संकल्प केला तसेच आगरी संस्कृती टिकली पाहिजे यासाठी आगरी शाळा हा उपक्रम राबविण्याचे तसेच तालुक्यातील आगरी समाजातील धवल गाणाऱ्या धवलारिन यांचा सन्मान करण्याचा जाहीर केले.तर घर तेथे आगरी समाजाचा आजीव सभासद अशी संकल्पना राबविण्यास सुरुवात केली असल्याचे जाहीर केले.
मुंबई महानगरचे खासदार संजय दिना पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आगरी भाषेबद्दल अभिमान असावा आपण आपली आगरी संस्कृती जपली पाहिजे असे प्रतिपादन केले.तर कामगार नेते महेंद्र घरत यांनी आगरी माणूस दानशूर असून समाजातील सर्व नेत्यांना अशा आगळ्या वेगळ्या कामासाठी एकत्रित आणण्याची गरज आहे.आपण समाजाचे देणे लागतो त्यासाठी समाजासाठी झटले पाहिजे असे प्रतिपादन केले.कर्जत तालुका आगरी समाजाच्या समाज हॉल चे सुशोभीकरण कामासाठी दहा लाखाचा निधी जाहीर केला.तर वसतिगृह इमारतीच्या जागा खरेदी साठी 25 लाख रुपये देण्याचे महेंद्र घरत यांनी जाहीर केले.भरत भगत यांनी कर्जत कृषी विभागाच्या जागेसमोर भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या नावाने प्रवेशद्वार उभारले जाणार असून ते प्रवेशद्वार कर्जत तालुक्यातील सर्व आगरी समाज खर्च करून उभारणार असल्याचे जाहीर केले.तसेच खासदार संजय पाटील यांच्या कन्या राजोल संजय पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या लॅपटॉप भेट देण्यात आले.ते लॅपटॉप कामगार नेते महेंद्र घरत यांचे हस्ते बारावीच्या दोन गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात आले.दहावी मधील 125 आणि बारावी मधील 35 अशा 160 विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये हुतात्मा हिराजी पाटील यांची प्रतिमा, सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्रक आणि शाळेची बॅग असे बक्षीस स्वरूपात देण्यात आले.