अटक होईल, या भीतीने शिंदे कधीही बेळगावला गेले नाहीत, संजय राऊतांचा उपमुख्यमंत्र्यांना टोला (फोटो सौजन्य-X)
Sanjay Raut on Maharashtra Karnataka Border Dispute : राज्याच महायुतीचं सरकार येण्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना गेमचेंजर ठरली. मात्र आता लाडकी बहिण योजनेच्या निकषात मोठे बदल केले जाणार असल्याचे बोललं जात आहे. आता यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्र्श्न वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे, अशातच याप्रकरणी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे नेते उदय सामंत आणि काही पदाधिकारी बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या मराठी भाषिक महामेळाव्याला जाणार आहेत. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार नेते संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. “एकनाथ शिंदे कधीही बेळगाव गेले नाहीत. मंत्री असताना शिंदे यांच्याकडे सीमाभागाची विशेष जबाबदारी होती. अटक होईल, या भीतीने ते कधीही बेळगावला गेले नाहीत. शिंदेंनी कधीही बेळगावमधील मराठी जनतेकडे पाहिले नाही. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे राज्य आहे, ही पळवाट नाही, असे सांगून बेळगावमधील मराठी भाषिकांच्या मागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ठामपणे उभा आहे आणि तिथं आमचे शिवसैनिक महामेळाव्यात सहभागी होतील, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले.
तर निवडणुकीच्या आधी कोणतीही शहनिषा न करता सरसकट 1500 रुपयांच्या व्यवहार केला त्यावर अनेकांचे आक्षेप होते. मुख्यमंत्र्यांनी 2 दिवस आधी सांगितले होते की निकष बदलावे लागतील. निकष, नियम यांचं भान राहिलं नाही त्यांना मत विकत घ्यायची होती. अनेक कमवत्या महिलांचे उत्पन्न चांगले आहे अशा घरातील 3 महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे जात आहेत. काही लाख महिला आता त्यांच्या समोर आले. काही लाख महिलांना आतापर्यंत पैसे दिल्यावर हे लक्षात आलं का? आमची एवढीच प्रार्थना आहे की ज्या महिलांना पैसे दिले ते परत घेऊ नका, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
“हे पैसे तुम्ही चुकीच्या मार्गाने दिलेत आणि आता तुमचे डोळे उघडलेत की या योजनेचा बोजा सरकारच्या तिजोरीवर पडतोय, त्यामुळे ती योजना बंद करायला हवी. आता त्यांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. पैसे कुठून आणणार, उत्पन्नाचे साधन काय, हे आता नवीन सरकारच्या लक्षात आलं आहे. आता आमची एवढीच प्रार्थना आहे की ज्या महिलांना पैसे दिलेत ते काढून घेऊ नका. त्यांना नोटीस पाठवून पैसे जमा करा, असे सांगू नका. तुम्ही काहीही करु शकता, हे जे काही सुरु आहे, त्यावर बारीक लक्ष आहे”, असेही संजय राऊत म्हणाले.