कुठे गायब झाला पाकिस्तानी सरकारच्या नाकी नऊ आणणारा युवा नेता? एकेकाळी बनला होता इस्लामिक कायद्याचा रक्षक (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Pakistan News in Marathi : इस्लामाबाद : गेल्या काही काळात पाकिस्तानमध्ये (Pakistan) गोंधळाचे वातावरण आहे. पाकिस्तानचा शेजारी देश अफगाणिस्तानसोबत (Afghanistan) संघर्ष सुरु आहे, तर दुसरीकडे देशांतर्गतही गोंधळाचे वातावरण आहे. पाकिस्तानची तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (TLP)ही कट्टर इस्लामिक संघटना शाहबाज सरकारची डोकेदुखी बनली आहे.
या संघटनेने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सरकारविरोधात आणि इस्रायलविरोधात पंजाबमध्ये आंदोलन केले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला होता. या आंदोलनात पाकिस्तानी पोलिस, लष्करी अधिकारी आणि अनेक सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला. परंतु या आंदोलनानंतर TLP चा प्रमुख साद रिजवी अचानक गायब झाला आणि संपूर्ण पाकिस्तानमध्ये गोंधळ उडाला. सध्या साद रिजवी नेमका कुठे आहे याबद्दल अनेत तर्क-वितर्क लावले जात आहे. मात्र अद्याप त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही.
पाकिस्तानच्या डॉन या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पंजाब पोलिस सध्या साद रिझवी आणि त्याचा भाऊ अनस रिझवीचा शोध घेत आहेत. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही पाकिस्तानच्या अधिकृत काश्मीरमध्ये झालेल्या आंदोलनानंतर पळून गेले आहे. मुरिदके येथे दोघांवर कारवाई करण्यात आली होती. परंतु येथून त्यांनी पळ काढला आणि त्यानंतर त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.
सध्या पंजाब पोलिसांनी सर्वत्र अलर्ट जारी केला असून दोन्ही भावांचा शोध घेतला जात आहे. सध्या दोघेही पोलिसांच्या कारवाईत जखमी झाले असल्याचे मानले जात आहे, परंतु अद्याप याची पुष्ट करण्यात आलेली नाही. याच वेळी पंजाब सरकारने TLP वर बंदी घालण्याची शिफारस सरकारकडे केली आहे. तसेच फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी देखील साद रिझवीचा शोध घेत आहे. त्याच्या बँकांच्या खात्यांचा मागोवा घेतला जात आहे.
कोण आहे साद रिझवी?
३१ वर्षीय साद रिझवी एक कट्टर इस्लामिक धार्मिक नेता म्हणून ओळखला जातो. तो TLP चे संस्थापक खादीम हुसैन रिझवी यांचा मुलागा आहे. त्याने आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर TLP ची जबाबदारी स्वाकरली होती. साद रिझवी स्वत:ला पैगंबर मोहम्मद यांचा आणि इस्लामिकतेचा रक्षक म्हणून संबोधतो. त्याच्या नेतृत्त्वाखाली पाकिस्तानमध्ये TLP ने अनेक हिंसक आंदोलने केली. नुकतेच पाकिस्तानच्या पंजाबमध्ये इस्रायलीविरोधात झालेल्या आंदोलनामागे त्याचा हात असल्याचे सांगितले जाते. सध्या त्याचा ठावठिकाणा घेतला जात आहे, मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.