निवडणूक आयोगाविरोधात विरोधी पक्ष 1 नोव्हेंबरला मुंबईत विराट मोर्चा काढणार
निवडणूक आयोगाच्या या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराविरोधात येत्या एक नोव्हेंबला मुंबईत राज्यातील सर्व विरोधा पक्षांच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील गाव-खेड्यातून, जिल्ह्या-जिल्ह्यातून लाखो लोक या मोर्चात सहभागी होणार आहेत. या मोर्च्याच्या माध्यमातून मतदारांची ताकद निवडणूक आयोग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना दाखवली जाणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ या मोर्च्याचे नेतृत्व करणार आहेत. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगाविरोधात विरोधी पक्षांची जोरदार लढाई सुरु आहे. शिवसेना (ठाकरे गट)चे नेते संजय राऊत यांनी याबाबत सांगितले की, ही लढाई आम्ही राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये लढत आहोत, तर आता ती महाराष्ट्रातही सुरु झाली आहे. मात्र, त्यातून काय साध्य होईल याबाबत काही शंका आहेत. आज गोरेगावमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोठा मेळावा पार पडला. या वेळी पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी दोन मुद्दे मांडले. त्यांनी सांगितले की, “मतदान करा किंवा करू नका, पण निवडणुकीचं मॅच फिक्सिंग झालं आहे. आणि या मॅच फिक्सिंगविरोधातच आपली लढाई आहे.”
संजय राऊत यांनी यावेळी आणखी म्हटले की, “महाराष्ट्राच्या मतदार यादीमध्ये आजही 96 लाख बोगस मतदार आहेत, म्हणजे जवळपास एक कोटी. हे एक कोटी मतदार आमच्या दृष्टीने घुसखोर आहेत. या घुसखोरांना मतदार यादीतून बाहेर काढणं ही लोकशाहीची गरज आहे.”
दोन- तीन दिवसांपूर्वीच राज्यातील विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर येत्या १ नोव्हेंबरला मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात विराट मोर्चा काढणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणूका आणि महापालिका निवडणुकांच्या तोंडावरच हा मोर्चा काढला जाणार असल्याने या मोर्चाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.






