पुरंदवडे अकलूज येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रिंगण सोहळा पार पडला (फोटो - टीम नवराष्ट्र)
अकलूज : कृष्णा लावंड : स्वर्ग सुखाची अनुभूती देणारा वैष्णवांच्या दाटीत अश्वांच्या तीन नेत्रदीपक फेऱ्यांनी दौडीला प्रारंभ झाला. यावेळी टाळ मृदंगाच्या गजरात माऊली माऊली नामाचा उद्घोष सुरू होता. लाखो वैष्णवांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा आणि वारीच्या वाटचालीत नवचैतन्य निर्माण करणारा हा पहिला गोल रिंगणाचा सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पुरंदावडे येथे पार पडला. दुपारचे जेवण करून सायंकाळी माळशिरस ठिकाणी मुक्कामी विसावला.
यावेळी पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांसह परिसरातील ग्रामस्थांनी हजेरी लावली होती. या रिंगण सोहळ्याने भाविकांचे डोळ्यांचे पारणे फेडले. नातेपुते येथील मुक्कामानंतर माऊलींच्या पालखीचे पहिल्या गोलरिंगणसाठी पुरंदावडे येथे ज्ञानोबा माऊली तुकाराम अशा जयघोषात आगमन झाले. सकाळी नऊ वाजल्यापासूनच रिंगणात भाविकांनी गर्दी केली होती. गोल रिंगणासाठी दुपारी अश्व पुरंदावडे येथील रिंगणात दाखल झाला. त्याचबरोबर रथा पुढील दिंड्याही दाखल झाल्या. या दिंडीमध्ये पुरुष व महिला वारकरी सहभागी झाले होते. भजनाच्या तालावर ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष करीत या दिंडीने उपस्थित लाखो भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दुपारी 12.35 मिनिटांनी माउलींचा रथ सोहळा पुरुंदावडे येथील रिंगण ठिकाणी पोहोचला. पालखीने एक फेरी मारली व पालखी मध्या ठिकाणी ठेवण्यात आली. पालखीची पूजा अर्जुनसिंह मोहिते पाटील, सरपंच राणी मोहीते, ,उपसंरपंच देविदास ढोपे यांच्या हस्ते करण्यात आली.चोपदार बाळासाहेब यानी रिंगण लावून घेतले. यानंतर टाळकरी, विणेकरी, तुळशी वृंदावन धारक महिला झेंडेकरी गोल रिंगण झाले. झेंडेकर यांनी पहिल्यांदा गोल मारून अश्वांना गोल रिंगण दाखवले. पुणे येथील राजश्री जुन्नरकर यांनी आकर्षक अशी रांगोळी रिंगण भोवती काढल्यामुळे ही रांगोळी मने आकर्षित करीत होती.
दुपारी 01:22 वाजता रिंगणासाठी अश्व सोडण्यात आले आणि माऊली माऊली असा जयघोष करीत तीन फेऱ्या पूर्ण केली. दोन्ही अश्वांनी रथासमोर सत्तावीस दिंडी व रथामागील वीस दिंड्या समोर नेत्रदीपक दौड घेत दिव्य सोहळा पार पडला. यावेळी विठुनामाच्या गजरात रिंगणासाठी धावताना आबालवृद्धांचे भान हरपले होते . वारकरी भाविकांनी रिंगण सोहळ्या दरम्यान अलिखित शिस्तबद्ध नियमांचे दर्शन घडवले. गोल रिंगण सुरू असतानाच उपस्थित लाखो भाविकांनी ज्ञानबा तुकारामाचा एकच जयघोष केला. या जयघोषाने अवघे पुरंदावडे आसमंत दुमदुमले.
अश्व पुढे जात असताना त्यांच्या चरणी असणारी रस भाळी लावण्यासाठी एकच झुंबड उडाली . त्यानंतर महिला पुरुषांनी फुगडय़ांचे फेर धरले. कोणी टाळ मृदुंगांच्या तालावर विठूनामाचा ठेका धरला. विठ्ठलाच्या दारी कोणी लहान थोर नाही या भावनेने प्रत्येक जण एकमेकांचे पाया पडत होते
रिंगणाचे अश्व विसावताच वारकरी मैदानात उतरले दिंड्या दिंड्यामध्ये विविध खेळ रंगले. हुतुतू, गड्यास गडी, हमामा, सुरपाट, कबड्डी, खो-खो, फुगडी अशा खेळांनी वारकर्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. चोपदारांच्या निमंत्रणानंतर उडीच्या कार्यक्रमासाठी सर्व दिंड्या पालखीच्या सभोवती गोलाकार बसल्या. टाळ, मृदुंगाच्या साथीने ” ज्ञानोबा माऊली तुकाराम ” अशा गजरात आसमंत व्यापून टाकणारा नादब्रह्म सुरू झाला. वृद्व, महिला आणि अवघी तरुणाई तल्लीन होऊन नाचत होती. एकात्म भक्तीभावाचा हा शाश्वत सुखाचा सोहळा भाविकांनी अनुभवला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सकाळपासूनच कधी उन्ह तर कधी ढगाळ तर कधी लहान पावसाच्या सरीच्या वातावरण निर्माण झाले होते. गोल रिंगण सोहळासाठी वारकरांचा वाटचालीचालीत नवचैतन्य निर्माण झाले होते. यामुळे वैष्णवांची पाऊले पंढरीच्या दिशेने झपझप पङत होती. रिंगण सोहळा पाहण्यासाठी पुरंदावडे शेजारील सर्व गावांची त्या ठिकाणी ग्रामस्थ गोळा झाले होते. नातेपुते ते पुरंदावडे या वाटचालीत विविध ग्रामपंचायती सरपंच पदाधिकारी व भाविकांनी माउलींसह सोहळ्याचे स्वागत करून दर्शन घेतले. हा दुपारचा गोल रिंगण सोहळा संपवून पुरंदावडे या ठिकाणी जेवण करून सायंकाळी माळशिरस येथे माऊलींचा सोहळा विसवला.