आळंदी : वैष्णवांचा मेळावा म्हणून संतांच्या वारीला नावाजलं जातं. भक्तीचा हा प्रवाह चैतन्याची उधळण करत आपली वाट चालत असतो. वारीच्या येण्याने फक्त वारकरी नाही तर अवघा समाज हरिनामात दंग होता. हा सोहळा लवकरच सुरु होणार आहे. आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर यांची आळंदी आणि संत तुकारामांचे देहू जय्यत तयारी करत आहेत. दरम्यान, वारीसाठी संत ज्ञानेश्वरांचा रथ सजला आहे. 500 किलोमीटरपेक्षा अधिक अंतर पार करावा लागणाऱ्या या रथाची योग्य काळजी घेत सजावट केली जात आहे.
संत ज्ञानेश्वर माऊलींचा रथ हा चांदीचा आहे. पालखी सोहळा जवळ आल्यामुळे या रथाची डागडुजी केली जात आहे. रथ चांदीचा असल्यामुळे त्याला चकाकी देण्यात आली आहे. रथ पालखी सोहळ्यामध्ये काळा पडू नये यासाठी पीओ कोटिंग करण्यात आले आहे. यामुळे माऊलींचा रथ शोभून आणि उठून दिसत आहे. तसेच रथाचे पार्टस, ब्रेक लायनर, रथ ओढण्याची क्षमता, रथातील लाईट ही सर्व तपासणी करण्यात आली आहे. रथाची सर्व्हिसिंग करण्यात आली आहे. या रथामध्ये पादुका घेतलेली पालखी ठेवण्यात येते. तसेच अनेक मानाचे वारकरी देखील या रथावर असतात. त्यामुळे रथ ओढण्याची क्षमतेची चाचणी घेण्यात आली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येत्या 29 तारखेला मार्गस्थ होणार आहे. अवघे काही दिवस शिल्लक असल्यामुळे जोरदार तयारी केली जात आहे. चांदीच्या रथाला पॉलिश करण्यात आले आहे. तसेच रथामध्ये जास्तीचे साहित्य घेण्यात आले असून त्याचसोबत ब्रेकिंग व वायरिंगच्या वस्तू अधिकच्या घेऊन ठेवण्यात आल्या आहेत. मार्गस्थ मार्गावर कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. अशी माहिती संस्थानचे कर्मचारी माऊली निंबाळकर यांनी दिली आहे.