इंदापूर : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या मुक्कामाच्या (Ashadhi Wari 2022) दुसऱ्या दिवशीही पंचक्रोशीतील दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी कायम होती. पालखी सोबत येणाऱ्या वारकऱ्यांची सरबराई करण्यात इंदापूरकर कोठेही कमी पडले नसल्याचे चित्र यंदाही दिसत होते.
या वारीत शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने वारकऱ्यासाठी मोफत वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. चरणसेवा, चहा व अल्पोपहार देण्यात. संस्थेच्या अध्यक्षा पद्मा भोसले, सचिव डॉ. देसाई, खजिनदार तुषार रंजनकर, विश्वस्त अरविंद गारटकर, केंद्राचे डॉ. मनोजकुमार शिंदे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
याशिवाय, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कारखान्याचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते व उपाध्यक्ष भरत शहा, जिजाऊ फेडरेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील, जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील-ठाकरे व सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांचे उपस्थितीत मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप करण्यात आले.