इंदापूर : आकाशात काळ्या पांढऱ्या ढगांचे थवे…वातावरणातला उष्मा निववण्यासाठीच विठुरायाच्या आशीर्वादाने पडलेली पावसाची हलकी सर…अन् ग्यानबा तुकारामाच्या जयघोषात, वाऱ्याची पैजा घेत लाल मातीवरुन धावणारे कृष्णकांती अश्व…त्यांना बघण्यासाठी आसुसलेले लक्षलक्ष डोळे…अश्वांच्या टापाखालची माती उचलून, ती मस्तकी धारण करण्यासाठी उसळलेली भाविकांची गर्दी…या साऱ्यांवर गर्जत गुंजत राहणारा नामाचा गजर…टाळ, चिपळ्या, मृदुंगाचा नाद, अशा भक्तिमय वातावरणात आज (दि.२) इंदापूरात रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुराबाई कदम हायस्कूलमध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे नेत्रदीपक अश्वरिंगण पार पडले.
नेहमीपेक्षा उशीरानेच निमगाव केतकीहून शहरातील श्रीराम वेस नाक्यावर पालखीचे आगमन झाले. नगराध्यक्षा अंकिता शहा, भाजप नेते हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, मुकुंद शहा, पोपट शिंदे व इतरांनी पालखी व अश्वांची पूजा केली. त्यानंतर रिंगण सोहळ्यास सुरुवात करण्यात आली. विणेकरी, पखवाजवाले, तुळशीवाल्या महिला रिंगणात धावल्या. सर्वात शेवटी आकर्षणाचे केंद्रबिंदू असणारे अश्व रिंगण झाले.
पालखी मुक्कामाच्या ठिकाणी श्री नारायणदास रामदास हायस्कूलच्या प्रांगणाकडे मार्गस्थ झाली. यावर्षी इंदापूर शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांनी वाहतुकीला शिस्त लावली आहे. पालखीसोबत खेळणी व इतर वस्तुंची विक्री करणाऱ्या सर्व व्यावसायिकांना शंभर फुटी रस्त्याकडे हलवण्यात आले आहे.
बारामतीकडून प्रशासकीय भवनजवळून पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गापर्यंत येणाऱ्या रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी मोकळी ठेवण्यात आली होती. दुसऱ्या बाजूला दुतर्फा दुकाने लावण्यात आली होती. तर महामार्गापासून इंदापूर महाविद्यालयापर्यंतच्या रस्त्याच्या एका बाजूने पादचारी तर दुसऱ्या बाजूने दुचाकी व छोटी चारचाकी वाहने सोडण्यात येत असल्याने नेहेमीचा कोलाहल व गोंगाट दिसत नव्हता.