बारामती : मिळालेल्या पदाचा उपयोग सर्वसामान्यांच्या हितासाठी केल्यास, समाज निश्चित दखल घेतो, त्यामुळे सरपंच व उपसरपंच यांनी गावचा विकास आराखडा तयार करून गावचा सर्वांगीण विकास करावा, असे आवाहन माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. दैनिक नवभारत वृत्तपत्र समूहाचे मराठी दैनिक नवराष्ट्रच्या वतीने बारामती येथील हॉटेल रॉयल इन या ठिकाणी बारामती सह, इंदापूर, दौंड, पुरंदर व भोर या तालुक्यातील आदर्शवत कार्य करणाऱ्या सरपंच व उपसरपंच यांना विविध पुरस्काराने दत्तात्रय भरणे व एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी भरणे बोलत होते.
यावेळी भरणे म्हणाले, गावामध्ये सरपंच हा महत्त्वाचा घटक असतो. सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून गावातील सर्वच घटकासाठी जीव ओतून काम करण्याची आवश्यकता असते. मिळाले पद दिखाऊपणासाठी नसून सर्वसामान्यांच्या हितासाठी असते, ही बाब प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे पाणी, आरोग्य, वीज, रस्ते, गटार व्यवस्था या मूलभूत सुविधा प्रत्येक घटकांना देण्यासाठी गावचा विकास आराखडा तयार करण्याची आवश्यकता असते. सरपंच व उपसरपंच यांना काम करण्याची मोठी संधी असते. पदाचा गर्व न बाळगता काम करण्याची आवश्यकता आहे. दै नवराष्ट्र ने आयोजित केलेला हा सन्मान कौतुकास्पद असून चांगले काम करणाऱ्या सरपंच व उपसरपंच यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यामध्ये आणखी काम करण्याची ऊर्जा निर्माण होईल असा विश्वास भरणे यांनी यावेळी व्यक्त केला.
राजेंद्र पवार यांनी आपल्या भाषणात नवराष्ट्र ने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक करून ते म्हणाले, गावच्या प्रमुखांनी नेहमी सावध राहणे गरजेचे असून त्यांच्यामध्ये धडपड व बारीक-सारीक गोष्टींची जाणीव हवी. निधीचा योग्य विनियोग हवा यासाठी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सरपंच मंडळींनी गाव समृद्ध करण्यासाठी विविध योजना राबविण्याची गरज आहे. गावातील महिला पुरुष शेतकरी यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढण्यासाठी सरपंचांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. गावातील महिला व पुरुषांचे उत्पन्न वाढल्यास ग्रामपंचायतींना कर गोळा करणे सोपे होईल. त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी गावच्या प्रमुखांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन राजेंद्र पवार यांनी यावेळी केले. दरम्यान कार्यक्रमाच्या प्रारंभी मधुबन फार्म प्रा लि चे प्रविण कस्पटे, नेटसर्फ चे अमित शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
[read_also content=”महापालिकेच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे कर आकारणीचे अधिकार काढले https://www.navarashtra.com/maharashtra/the-taxing-powers-of-municipal-zonal-officers-were-removed-nrdm-314884/”]
माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मला सरपंच अथवा उपसरपंच पदाचा अनुभव नव्हता. मी सहकारी संस्थेमध्ये कार्यरत होतो. मात्र अचानक जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची संधी शरद पवार, अजित पवार व सुप्रिया सुळे यांच्यामुळे मिळाली. मात्र मिळालेल्या संधीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास निधी आणून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावले. आपण केलेल्या कामाची समाज दखल घेतोच. त्यामुळे या कामाची पोचपावती म्हणून जनतेने आपणास निवडून दिले. यानंतर मंत्री पदाची संधी मिळाली. मात्र सर्वसामान्य हाच केंद्रबिंदू मानून आपण पदाचा कधीही गर्व केला नाही. त्यामुळे सत्ताही रुबाबासाठी नसून जनतेच्या हितासाठी असते हे प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे, असे दत्तात्रय भरणे यांनी यावेळी सांगितले.