संग्रहित फोटो
फलटण : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी (Sant Dnyneshwar Palkhi) सोहळा सातारा जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या कालावधीत जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांच्या माध्यमातून सतत पाठपुरावा करुन सोहळा शांततेत व सुरक्षित पार पडेल, यासाठी संपूर्ण व्यवस्था चोख ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे.
यावर्षी फलटण तालुक्यात पालखी तळावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत असून, त्याद्वारे सोहळा अधिक सुरक्षित पार पाडण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे दिसते. पालखी सोहळा मुक्काम आणि विसाव्याच्या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची गर्दी होणार नाही. मात्र, सर्वांना सुलभतेने दर्शन घेता येईल याची व्यवस्था पुरेसा पोलिस बंदोबस्त आणि बॅरेगेटींगद्वारे करण्यात येणार आहे.
आवश्यक ठिकाणी ज्यादा पोलीस बंदोबस्त
मुक्कामाच्या ठिकाणी सोहळा पोहोचण्यापूर्वी वॉच टॉवर आणि नियंत्रण कक्ष उभारुन संपूर्ण पालखी तळाची सुरक्षितता तपासून आवश्यक तेथे जादा पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. पालखी मार्गावरील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना पास देवून अन्य खाजगी वाहनांसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करुन त्याबाबत सर्वांना योग्य प्रसिध्दी द्वारे माहिती देवून त्याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.