रस्त्याचे खोदकाम वारंवार सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात रस्त्यातील धूळ हवेत पसरत असून याचा नाहक त्रास शाळेतील मुला-मुलींना, नागरिकांना, तसेच वाहतूकदारांना सहन करावा लागत आहे. या धुळीकणांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. रस्त्याच्या आजूबाजुच्या शिवारात पिकांवर सगळीकडे धुळीचा थर पाहायला मिळत आहे. यासाठी दिवसातून किमान चार ते पाच वेळा तरी रस्त्यावर पाणी मारणे गरजेचे असताना ठेकेदाराकडून याबाबत टाळाटाळ होत असल्याचे दिसत आहे.
यात आणखी भर म्हणून रस्त्याच्या कामाला डबडेवाडी येथून जाणाऱ्या धोमच्या उजव्या कॅनॉलमधून राजरोसपणे पाण्याचे टँकर भरून जात आहेत. एकप्रकारे पाण्याची चोरी केली जात असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. शेतकऱ्यांकडून जर असे घडले असते तर कदाचित धोम उजव्या कालव्याच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यावर दंडात्मक कारवाई केली असती. मात्र या ठेकेदारांवर पाटबंधारे विभाग मेहरबान झाला आहे असेच चित्र दिसत आहे. कुडाळ हद्दीतून वाहत असणाऱ्या निरंजना नदीतून देखील पाणी उपसा केला जात आहे.
या रस्त्यामध्ये कुडाळ ते आलेवाडी दरम्यान कमीत-कमी दहा ते बारा नवीन पुलाचे काम करण्यात येणार आहे. परंतु जुने पूल पाडून त्याचे निघालेले साहित्य नेमके गेले तरी कुठे असा सवाल स्थानिक नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. रस्त्याचे खोदकाम वारंवार सुरू असल्याने गाड्यांचा मेंटेनन्स वाढत चालला आहे. याचा नाहक त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे ठेकेदाराकडून लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण व्हावे अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जाऊ लागली आहे.
रस्त्याच्या कामाच्या नावाखाली कुडाळ ते आलेवाडी दरम्यान असणाऱ्या काही गावालगत अवैधरित्या मुरूम उत्खनन सुरू असल्याचे नागरिकांच्या व वाहतूकदारांच्या निदर्शनास येऊ लागले आहे. अशा अवैधरित्या खोदकामावर जावली तहसील प्रशासनाकडून कारवाई केली जाणार की ठेकेदाराला पाठीशी घातले जाणार, अशी चर्चा सध्या जावली तालुक्यामध्ये रंगू लागली आहे.
Ans: हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 आणि 17 यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून दळणवळण अधिक सुलभ व जलद करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
Ans: सध्या महामार्गाचे काम प्रगतीपथावर असून अनेक ठिकाणी खोदकाम, रुंदीकरण व पुलांची कामे सुरू आहेत.
Ans: रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी पाणी न मारल्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. त्यामुळे नागरिक, शाळकरी मुले, वाहनचालक व शेतकऱ्यांना आरोग्यविषयक त्रास सहन करावा लागत आहे.






