ओडिशातून निघालेलं कासव गुहागरच्या किनाऱ्यावर आढळलं, समुद्रातून तब्बल ३५०० किमी प्रवास
कासवाची चाल सगळ्यात संथ मानली जाते. कासव एकाच ठिकाणी खूप काळ राहतात. एका कासवाने मात्र वैज्ञानिकांनाही आश्चर्यचकीत केलं आहे. या कासवाने तब्बल ३५०० किलोमीटरचा प्रवास केला आहे. एका मादी ऑलिव्ह रिडले कासवाने ओडिशामधून महाराष्ट्रातील गुहागर बीचपर्यंत प्रवास केला आहे. कासवांचे स्थलांतर कसे होते याविषयी आतापर्यंत वैज्ञानिकांची जी समज होती, ती या ऑलिव्ह रिडले चुकीची ठरवली आहे. तसंच वैज्ञानिकांना आपल्या समजुती पुन्हा विचार करण्यास भाग पाडलं आहे.
पूर्वी असं मानलं जात होतं की पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यांवर कासव वेगवेगळ्या ठिकाणी अंडी घालतात, पण या मादी ऑलिव्ह रिडले कासवाच्या प्रवासाने ती समजूत चुकीची ठरवली आहे. २०१८ साली ओडिशाच्या गहिरमाथा बीचवर सामूहिक अंडी घालण्याच्या वेळी या कासवाला टॅग करण्यात आलं होतं. झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. बसुदेव त्रिपाठी यांनी या कासवाला 03233 असा टॅग दिला होता.
टॅग लावण्याचा अर्थ म्हणजे कासवाच्या पंखांवर एक ओळख चिन्ह लावणे, ज्यामुळे त्याला ओळखता येते. यंदा २७ जानेवारी रोजी वैज्ञानिकांनी हेच कासव गुहागर बीचवर अंडी घालताना पाहिले आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. महाराष्ट्राच्या मॅन्ग्रोव्ह फाउंडेशनच्या टीमने रात्रीच्या वेळी कासवांना टॅग करताना हे मादी कासव अंडी घालताना आढळलं. त्या कासवावर आधीपासून टॅग होता.
या टॅगवर दिलेल्या माहितीनुसार हे मादी कासव ओडिशामधून आलेले असल्याचे समजले. त्यामुळे आता असे मानले जात आहे की या मादी कासवाने पूर्व किनाऱ्यावरून पश्चिम किनाऱ्यावर म्हणजेच ३५०० किलोमीटरचा प्रवास केला आहे. वैज्ञानिकांचा अंदाज आहे की हे कासव ओडिशाहून श्रीलंकेपर्यंत गेले असावे आणि तिथून महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात आलं असावं, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.