सफाई कामगाराला 20 हजारांची लाच मागणं वरिष्ठ लिपिकाला भोवलं; 'एसीबी'ने जाळ्यात पकडलं (संग्रहित फोटो)
भंडारा : रुग्णालयातील सफाई कामगाराच्या वडिलांच्या सेवानिवृत्ती बिलातून रिकव्हरी न करण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वरिष्ठ लिपिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनमोल मोहनलाल गजभिये (वय 45) असे जिल्हा सामान्य रुग्णालयातील लाचखोर वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे.
तक्रारदार हे सामान्य रुग्णालय भंडारा येथे सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे वडील सामान्य रुग्णालय भंडारा येथून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या सेवानिवृत्ती बिलामधून 1 लाख 97 हजार रुपयांची रिकव्हरी न करण्यासाठी आरोपी वरिष्ठ लिपिक अनमोल मोहनलाल गजभिये यांनी 20 हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने यांनी 25 एप्रिल रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा येथे तक्रार केली.
पडताळणीदरम्यान आरोपीने लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे शासकीय रुग्णालय भंडारा या ठिकाणी शासकीय पंचासह तक्रारदाराकडून कारवाईचे नियोजन केले होते. आरोपीला संशय आल्याने त्याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. तरीही आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीची घरझडती सुरू करण्यात आली. आरोपीचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असून, पुढील निरीक्षण करून तपास सुरू आहे.
ही कारवाई ला.प्र.वि. नागपूरचे पोलिस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन कदम, अप्पर पोलिस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनात पो. उप. अधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार यांच्या पथकाने केली आहे.
बुलडाण्यातही लाचप्रकरण
दुसऱ्या एका घटनेत, बुलढाणा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कथित फसवणुकीच्या प्रकरणाची चौकशी न करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पोलिस कर्मचारी अनिल कुकडेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई 16 एप्रिल रोजी रात्री करण्यात आली आहे.