Mumbai News: विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधानभवनाच्या आवारात महिनाभरापूर्वी दोन गटांमध्ये राडा झाला. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते ऋषिकेश टकले आणि आणखी चार जणांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण केली होती.
या प्रकरणाची नोंद पोलिसांत झाली असून, पोलिसांनी पडळकर यांच्या कार्यकर्त्यांसह नितीन देशमुख यांनाही अटक केली. घटनेपूर्वी गाडीचा दरवाजा लागल्यावरून देशमुख यांनी थेट आमदार पडळकरांना जाबही विचारला होता. यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि वाद थेट मारहाणीपर्यंत पोहोचला. गोपीचंद पडळकरांना नडणाऱ्या याच नितीन देशमुख यांना शरद पवार यांनी मोठी जबाबदारी दिल्याची माहिती समोर आली आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत पक्षातील नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात नितीन देशमुख यांचाही समावेश आहे. त्यामुळे आता पक्षाची अधिकृत भूमिका माध्यमांसमोर मांडताना नितीन देशमुख प्रवक्त्याच्या भूमिकेत दिसतील. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आक्रमक आणि कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे नितीन देशमुख यांची पक्षाचे नवे प्रवक्तेपदी निवड झाली आहे. ते जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय असून, पडळकरांसोबत झालेल्या वादानंतर ते राज्यभर चर्चेत आले होते.
देशमुख यांची आक्रमक भूमिका यापूर्वीही दिसून आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असताना, अजित पवारांनी पहाटे देवेंद्र फडणवीसांसोबत शपथ घेतली होती, त्या वेळी अजित पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्यांमध्ये देशमुख हे अग्रस्थानी होते. प्रवक्तेपदी निवड झाल्यानंतर नितीन देशमुख यांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या.
नितीन देशमुख यांनी त्यांच्या फेसबुकवर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यात ते म्हणाले की, “आज माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चा अधिकृत प्रवक्ता म्हणून माझी नेमणूक झाल्याची घोषणा आमचे राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड साहेबांनी केली आणि त्या यादीत माझं नाव आलं. आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की एका सामान्य घरातील, कोणताही राजकीय वारसा नसलेल्या कार्यकर्त्याला एवढं मोठं पद मिळेल. पण बहुजनांचा विचार करणारा हा पक्ष, विचारांशी तडजोड न करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.आजवर लोकांसाठी रस्त्यावर उतरलो, अन्यायाच्या विरोधात उभा राहिलो, आणि ज्या विचारधारेवर विश्वास आहे त्यासाठी किंमतही मोजली. आता तीच निष्ठा आणि लढाऊ वृत्ती घेऊन मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काम करणार आहे.”