विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची ऑफर; शरद पवारांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, ” विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी मी दिल्लीत असताना दोन लोक मला भेटायला आले होते. त्यांची नावे आणि पत्ते माहिती नाहीत. त्यांनी मला सांगितलं की, महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा आहेत. आम्ही तुम्हाला विधानसभेच्या १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी देतो. स्पष्ट सांगायचं झालं तर निवडणूक आयोगाबाबत माझ्या मनात यत्किंचितही शंका नव्हती. असे लोक भेटत असतात म्हणून मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर मी त्या लोकांची आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घालून दिली. त्यांनी राहुल गांधींसमोरही त्यांचं म्हणणं मांडलं. पण राहुल गांधी आणि मी, आपण या गोष्टींकडे लक्ष देऊ नये, आपण लोकांकडे जाऊ आणि लोकांचा आशीर्वाद कसा मिळेल ते पाहू, असा निर्णय आम्ही घेतला.”
शरद पवार यांच्या दाव्यानंतर आता शरद पवार आणि राहुल गांधींना भेटणाऱ्या त्या दोन व्यक्ती कोण होत्या, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. या दोघांनी शरद पवार आणि राहुल गांधींनाच नेमकी ऑफर कशी दिली, ती माणसं कोण होती, त्यांचा निवडणूक आयोग किंवा मतदान प्रक्रियेशी काय संबंध होता, असेही प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. पण राहुल गांधी यांच्यानंतर शरद पवार यांच्या या दाव्याने राज्याच्या राजकारणात नवा स्फोट झाल्याचे नाकारता येणार नाही.
शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास…; शेतकरी हक्क परिषदेतून बच्चू कडू यांचा इशारा
शरद पवार यांच्या या दाव्यानंतर त्यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवरही भाष्य केलं आहे. राहुल गांधी यांच्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. राहुल गांधींनी निवडणूक आयोगांवर केलेल्या आरोपांची चौकशी व्हायला पाहिजे. राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर संशय घेण्यास वाव आहे. निवडणूक आयोगानेही त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत. पण आयोगाने राहुल गांधींकडे शपथपत्र मागणे चुकीचे आहे. निवडणूक आयोगावर आरोप झाले आहेत, तर त्याचे उत्तरही आयोगाकडून मिळाले पाहिजे, भाजपाकडून नको, असा टोलाही शरद पवार यांनी यावेळी मारला.
दरम्यान, शरद पवार यांच्या दाव्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीदेखील त्यांच्या दाव्याला दुजोरा दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, शरद पवार यांनी केलेला गौप्यस्फोट खरा आहे. त्यांच्या मते, दोन व्यक्ती पवार साहेबांकडे आले होते आणि 160 जागांवर मतांची फेरफार करण्याची ऑफर दिली होती. हे लोक मतदार यादीत धांदली करण्याबाबत बोलण्यासाठी आले होते, मात्र पवार साहेबांनी त्यांना दाद दिली नाही आणि असे होऊ शकत नाही असे स्पष्ट सांगितले.






