कोल्हापूर – ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Udhhav Thackery) आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यात झालेल्या युतीनंतर मविआ नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातबी विसेष करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही युती रुचलेली नसल्याचं सांगण्यात येतंय. त्यातच ठाकरे-आंबेडकरांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत आमच्यासोबत पवार येतील, असं विधान करुन नवी चर्चा सुरु केली होती. त्यामुळं मविआत वंचितला स्थान मिळणार का नाही, याची स्पष्टता नसल्याचं मानण्यात येत होतं. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले असता याबाबतचा कोणताही प्रस्ताव अद्याप मविआपुढं आलेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. ठाकरे गट आणि वंचितची युती झाली असली तर वंचितच्या मविआत येण्याबाबत कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही, याबाबत चर्चाच झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. एकूणच ठाकरे गटाच्या या निर्णयानं पवार फारसे समाधानी नसल्याचा सूर दिसून आला.
शरद पवार हे भाजपाला पडद्याआडून मदत करत असल्याचं वक्तव्य युतीच्या घोषणेनंतर नंतर आंबेडकरांनी नवा वाद सुरु केला होता. अजित पवार आणि फडणवीस यांच्या झालेल्या पहाटेच्या शपथविधीची आठवणही त्यांनी करुन दिली होती. त्यानंतर यावर राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. पहाटेचा शपथविधी ही पवारांची राष्ट्रपती राजवट हटवण्यासाठी खेळी असू शकते, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं होतं. तर पवारांबाबत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी भान बाळगावं, असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंचा सल्ला ऐकेन, राऊतांचा नाही, असं उत्तर आंबेडकरांनी दिलं होतं.
शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणुकीत उमेदवारांच्या पाठिंब्यावरुन महा विकास आघाडीतील गोंधळ आधीच समोर आला होता. त्यावर ठाकरे गटाकडून टीकाही करण्यात आली. त्यानंतर वंचितशी युतीची घोषणा करण्यात आली. आता आंबेडकरांच्या नव्या वक्तव्यांनी मविआतील वातावरण अधिक कलुषित होण्याची शक्यता निर्माण झाल्याचं मानण्यात येतंय.
आगामी मुंबई महापालिका आणि विधानसभा निवडणुका या ठाकरे गटासोबत लढवाव्यात, अशी भूमिका सातत्यानं गेल्या वर्षभरापासून पक्षाच्या व्यासपीठावर शरद पवार मांडत आहेत. मुंबई महापालिकेत ठाकरे गट प्रबळ असल्यानं तिथं मविआ एकत्र लढणार का, हा प्रश्न आहे. काँग्रेसनं मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा याआधीच केली आहे. त्यात वंचितशी युती करताना ठाकरे गटानं मविआला विचारात घेतलं नसल्याचं आजच्या पवारांच्या वक्तव्यानं उघड झालंय. मुंबई महापालिकेत ठाकरे गटाची भूमिका काय असेल, हे त्यांनी लवकरात लवकर स्पष्ट करावं, असं अल्टिमेटम राष्ट्रवादीकडून त्यांना देण्यात आलंय. त्यामुळे येत्या काळात मविआतील दोन प्रमुख पक्ष असलेल्या ठाकरे गट आणि राष्ट्रवादीची मनं दुभंगणार तर नाहीत ना, असा प्रश्न विचारण्यात येतोय.