शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; बड्या नेत्याने सोडली साथ
Sharad Pawar News: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची काल ( 4 नोव्हेंबर) घोषणा करण्यात आली. पण निवडणुकांची घोषणा होताच अवघ्या २४ तासांच्या आत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुण्यात मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील अतुल देशमुख हे आज गुरूवारी ( 6 नोव्हेंबर) एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. गुरूवारी चाकणमध्ये होणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात अतुल देशमुख शिंदे गटात प्रवेश करणर आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती अद्यापही कायम आहे. गेल्या अडीच-तीन वर्षात अनेक बड्या नेत्यांनी शरद पवार यांची साथ सोडली. त्यातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतुल देशमुख यांनीदेखील शरद पवार यांची साथ सोडून धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ला उत्तर पुण्यात मोठे खिंडार पडले आहे. उत्तर पुण्यातील प्रभावशाली नेते अतुल देशमुख यांनी शरद पवारांची साथ सोडत शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. देशमुख यांच्यासोबत नगरसेवक, पंचायत समिती सदस्य आणि हजारो कार्यकर्तेही धनुष्यबाण चिन्ह हाती घेणार आहेत. हा पक्षप्रवेश गुरुवारी चाकण येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या भव्य मेळाव्यात होणार आहे.
अतुल देशमुख हे उत्तर पुण्यातील महत्त्वाचे स्थानिक नेते असून, त्यांची राजगुरुनगर, आळंदी आणि चाकण या नगरपालिकांमध्ये लक्षणीय ताकद मानली जाते. अतुल देशमुख यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणही बदलण्याची शक्यता आहे. अतुल देशमुख यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. पण विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी भाजपला रामराम करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
खेड मतदारसंघातील जागावाटपात ही जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने त्यांना उमेदवारी मिळू शकली नही. त्यानतंरही त्यांनी आमदार बाबाजी यांच्या विजयासाठी मोठी भूमिकाही बजावली होती.
‘Ek Deewane Ki Deewaniyat’ ची क्रेझ अजून सुरुच; दुसऱ्या मंगळवारीही चित्रपटाची भरभरून कमाई
अलीकडच्या काळात पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि वरिष्ठांकडून झालेल्या दुर्लक्षामुळे त्यांनी तुतारी सोडून धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेतला. खेड तालुक्यात शिवसेना (शिंदे गट) नव्याने संघटन उभे करण्यासाठी जोमाने प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर अतुल देशमुख यांच्या पक्षप्रवेशामुळे सेनेला मोठे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. देशमुख यांच्या प्रवेश सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात असून, पुढील आठवड्यात खेड शहरात भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
देशमुख यांच्या हालचालींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका संघटनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, शिंदे गटाने आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्या चेहऱ्यांची तयारी वेगाने सुरू केली आहे. कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय असलेले देशमुख यांचे ग्रामपातळीवरील मजबूत नेटवर्क सेनेला तळागाळात बळकट करण्यास हातभार लावेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.






