पोहरा बंदी : वडाळी वन परिक्षेत्रात अवैधरित्या जनावरे (Illegal animals) चराई करणाऱ्यांवर वनविभाग कारवाई (Forest Department action ) करण्यासाठी गेले असता, वन विभागाचे पथक आणि मेंढपाळांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. वडाळी वनपरीक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे (Wadali Forest Range Officer Varsha Harne ) यांनी सोमवारी स्वत:हा ही धडाकेबाज कारवाई केली असून, त्यांनी मेंढपाळांजवळील चार जनावरे ताब्यात घेतले आहे. वनविभाग आणि मेंढपाळात झालेल्या या चकमकीनंतर हे प्रकरण बडनेरा पोलीस ठाण्यात ( Badnera Police Station )पोहोचले होते.
उपवनसरंक्षक चंद्रशेखरन बाला, सहायक उपवनसरंक्षक ज्योती पवार यांच्या मार्गदर्शनात वडाळी वनपरीक्षेत्र अधिकारी हरणे यांच्या नेत्तृत्वात वडाळी वर्तुळ अधिकारी शाम देशमुख, वनरक्षक चंद्रकांत चोले, सुरेखा पांडे, वनमजूर ओंकार भुरे, वाहन चालक संदीप चौधरी यांच्यासह सरंक्षण मजूर यांचे पथक सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अंजनगाव बारीतील राखीव वनक्षेत्रात गेले असता, त्यांना जंगलात अवैधरित्या मेंढ्या चराई करीत असल्याचे आढळून आले. वन कर्मचाऱ्यांनी मेंढ्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरु करून चार मेंढ्या ताब्यात घेतल्या. दरम्यान या कारवाईदरम्यान मेंढपाळांनी विरोध दर्शविल्याने गोंधळ उडाला होता.
वनविभागाने मेंढ्या ताब्यात घेतल्यानंतर मेंढपाळ्यांनी त्या मेंढ्या हिसकण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यावेळी वनविभाग व मेंढपाळांमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. दरम्यानच दगडफेक सुध्दा करण्यात आल्याने दगड एक कर्मचाऱ्याला सुध्दा लागला, तसेच एका महिला कर्मचाऱ्याला काठीने सुध्दा मारण्यात आली. तसेच, वनविभागाच्या वाहनाचे काचही फोडले. त्यानंतरही वनविभागाने जनावरे जप्तीची कारवाई केली. वन कर्मचाऱ्यांनी चार मेंढ्या ताब्यात घेण्यात यश मिळविले. या मेंढ्यांना वनविभागाच्या वाहनात टाकून जप्त करण्यात आले. त्यानंतर या जनावरांना वडाळी येथे ठेवण्यात आले.
वनविभाग अधिकारी व कर्मचारी आणि मेंढपाळांमध्ये झालेल्या संघर्ष बडनेरा पोलीस ठाण्यात पोहोचला. या घटनेची तक्रार वडाळी वनपरीक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे यांनी बडनेरा पोलीस ठाण्यात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी बाळकृष्ण यमगर, साहेबराव व गोमाजी यांच्याविरुध्द भादंविच्या कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा नोंदविला आहे.
अवैध चराई करणाऱ्या मेंढपाळांवर कारवाई करण्यासाठी वनविभागाचे पथक गेले होते. दरम्यान मेंढपाळांनी विरोध करून दगडफेक केली आणि काठीने कर्मचाऱ्यांना मारहाण केली. वन विभागाकडून चार जनावरे ताब्यात घेण्यात आले असून, कारवाई करण्यात आली. यासंदर्भात बडनेरा पोलीस ठाण्यातही तक्रार नोंदविण्यात आली आहे.
वर्षा हरणे, वडाळी वनपरीक्षेत्र अधिकारी
तक्रारीनुसार गुन्हा दाखल
वनविभागाच्या पथक अवैध चराई करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेले असता, जनावरे मालकांनी विरोध केला, दगडफेक व काठीने मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या घटनेच्या तक्रारीवरून आरोपींविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
बाबाराव अवचार, पोलीस निरीक्षक, बडनेरा ठाणे






