Eknath Shinde : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी (काल) सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादाची ठिणगी पडली. कारण ठरलं माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांची सत्ताधारी बाकावरील उपस्थिती. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित करताना तुम्ही देशद्रोह्याच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाहीत, असा घणाघात केला.
थेट अजित पवारांना पत्र लिहिलं
त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलेलो नाहीत, असे सांगितले. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट अजित पवारांना पत्र लिहिलं आहे, मलिकांना महायुतीत घ्यायला विरोध असल्याचं फडणवीस यांनी या पत्रात स्पष्ट केलं आहे.
नवाब मलिक यांच्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचे
देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर अजित पवारांना लिहिलेलं हे पत्र शेअर केलं आहे. दरम्यान आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ‘माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. सध्या केवळ प्रकृतीच्या कारणावरून ते जामीनावर तुरुंगातून बाहेर आहेत. त्यांना कोर्टाने अद्याप निर्दोष ठरवलेले नाही. त्यामुळे, त्यांच्याविषयीची आमची पूर्वीची भूमिका अजूनही कायम आहे.”
भूमिकेशी शिवसेना पूर्णतः सहमतच
‘सत्ताधारी पक्षांच्या बाकावरील त्यांची उपस्थिती संकेतांना धरुन नाही. आघाडीच्या घटक पक्षांनी त्यांचा पक्ष कसा चालवावा हा सर्वस्वी त्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु महायुतीमधील सर्व घटक पक्ष देशहित व जनहिताच्या ध्येयाने एकत्र आले आहेत. त्यामुळे काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेशी शिवसेना पूर्णतः सहमतच आहे. किंबहुना ही आम्ही परस्पर सहमतीनेच ती भूमिका घेतलेली आहे’, असंही पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
नाकाने कांदे सोलायची गरज नाही
तर पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, अजित पवार जनहिताचा आणि लोकभावनेचा आदर करूनच योग्य तो निर्णय घेतील. या विषयावरून विरोधकांनी नाकाने कांदे सोलायची गरज नाही, त्यांना तो आधिकारही नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.
मविआ सरकारमध्ये मंत्रीपदावर
नवाब मलिक तुरूगांत असताना ते मविआ सरकारमध्ये मंत्रीपदावर होते. त्यावेळी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे विरोधकांना या मुद्यांवर बोलण्याचा नैतिक आधिकार नाही असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.