मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या भाजप वा शिंदे गटात जाण्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. मात्र, शिंदे गटाने नार्वेकरांसाठी आपले दरवाजे बंद केल्याचे दिसत आहे.
वृत्तपत्रातील एका जाहीरातीत नार्वेकर यांनी धनुष्यबाण चिन्ह घातलेले टी शर्ट घातल्याने शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी नार्वेकरांची खिल्ली उडवली आहे. पक्षाचे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं असेल, तर ते परत वापरता येत नाही, मात्र जुनी जाहिरात रिपीट झाली असेल, असा टोला शंभुराज देसाईंनी नार्वेकरांना लगावला आहे.
मिलिंद नार्वेकर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदी निवड झाली आहे. त्याबद्दल नार्वेकरांचे अभिनंदन करणारी जाहीरात स्थानिक वृत्तपत्रात त्यांच्या समर्थकांनी दिली आहे. त्यामध्ये नार्वेकरांचा धनुष्यबाणाचा लोगो असलेला जुना टीशर्ट घातलेला फोटो छापण्यात आला आहे. मात्र, निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यापासून ठाकरे गटाकडून मशाल चिन्हाचाच जोरदार प्रचार केला जात आहे. त्यामुळे नार्वेकर यांना शुभेच्छा देणाऱ्या जाहिरातीत शिवसेनेचा धनुष्यबाण झळकल्याने चर्चेला तोंड फुटले आहे.