संग्रहित फोटो
स्वबळाची भाषा बदलली; आता महायुतीच!
शिंदे भाजपसोबतच महापालिका निवडणूक लढणार
भाजपमधील इच्छुकांमध्ये धास्ती निर्माण
पुणे/दीपक मुनोत : सुमारे दोन आठवड्यांपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली, त्यात निवडणुकीची रणनीती ठरविण्यात आली. भाजप स्वबळावर लढणार अशी घोषणा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली. त्यावेळी राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे सुद्धा उपस्थित होते. या घोषणेनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. शहराच्या सर्व भागातून इच्छुकांनी भाजपकडे अर्ज केले, त्यांच्या मुलाखती झाल्या.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुणे दौरा झाला. त्या दौऱ्यात त्यांनी अजित पवार यांच्या पक्षाशी आमच्या मैत्रीपूर्ण लढती होतील, असे जाहीर केले. वास्तविक पाहता पुण्यात महायुती होणार नाही, असे स्पष्ट न सांगता पुण्यात मैत्रीपूर्ण लढती होतील, असे मुख्यमंत्र्यांनी गोंडसपणे सांगून टाकले.
मात्र, त्याचवेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) यांच्याशी युती करण्याबाबतच्या शंका इच्छुकांच्या मनात राहिल्याच. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला पुण्याच्या भाजपमध्ये गृहित धरलेलेच नव्हते. मुंबईतही सन्मानपूर्वक वाटा मिळावा, याकरीता शिंदे अडून बसले होते. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि नंतर चक्रे फिरली. पुण्यात भाजपबरोबर शिंदे यांच्या शिवसेनेला सामावून घेण्याचे सूत्र ठरले, भाजपची स्वबळाची भाषा बदलली. रिपब्लिकन पक्ष आठवले गटाशी भाजपची युती आहेच. ती या निवडणुकीतही कायम रहाणार आहे, असे आता नव्याने जाहीर झाले आहे.
महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे पाच नगरसेवक ‘कमळ’ चिन्हावर निवडून आले होते. या पक्षासाठी भाजपकडून किमान पाच ते जास्तीत जास्त दहा जागा सोडण्यात येतील. शिवाय एकनाथ शिंदे यांचा स्वभाव पाहता ते पाच, दहा जागांवर समाधानी राहणार नाहीत. रिपब्लिकन पक्ष आणि शिंदे यांची शिवसेना यांना किमान २५ जागा तरी आता द्याव्या लागतील. या जागांवर भाजपमध्ये इच्छुक असणाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. भाजपबरोबर युती असल्याने शिंदे गटात उत्साह आल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे आणि या बातमीने भाजपमधील इच्छुकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
पुण्यात महायुती झाली, असे भाजपच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. अजित पवार यांचा पक्ष भाजपशी मैत्रीपूर्ण लढत देणार असताना महायुती झाली असे म्हणणे म्हणजे एक कोडंच आहे. प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या जास्त असली तरी, बंडखोरी होणार नाही, असा विश्वास भाजपच्या नेत्यांना आहे.






