शिवसेनेची उद्धव ठाकरेंवर टीका (फोटो -सोशल मीडिया)
मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करून धारावी बचाव आंदोलनाची हाक देणाऱ्या उबाठा गटाला शिवसेनेने व्यंगचित्र काढून फटकारले आहे. शिवसेनेकडून हे व्यंगचित्र त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर प्रसिद्ध करण्यात आले असून सध्या ते सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. त्यामुळे उबाठा गटाच्या आजच्या धारावी पुनर्वसन प्रकल्पविरोधी आंदोलनापूर्वीच शिवसेनेने त्यांच्यावर हल्ला केल्याचे स्पष्ट होत आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी तेथील रहिवाशांच्या घरांची नोंदणी सुरू असून ती अंतिम टप्प्यात आली आहे. देशात प्रथमच एखाद्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील अपात्र रहिवाशांना घरे देण्याचा निर्णय धारावीचे पुनर्वसन करताना राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे अपात्र झोपडीधराकांना सुद्धा हक्काची घरे मिळणार आहेत. तसेच पात्र, लाभार्थ्यांना ३५० चौरस फुटांची घरे देखील मुंबईत मिळणार आहेत. मात्र, याला थेट विरोध करण्याची भूमिका उबाठा गटाने घेत धारावी बचाव नावाने आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या या भूमिकेला प्रत्यक्ष धारावीतील सामान्य झोपडपट्टीधारक देखील विरोध करत आहेत. कारण, या झोपडपट्टी धारकांना हक्काचे व स्वतःच्या नावावर असलेले घर हवे आहे. म्हणूनच, ९० टक्क्यांहून अधिक धारावीकरांनी धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी राबवण्यात आलेल्या नोंदणी प्रक्रियेत सहभाग घेतला.
मुंबई महानगरातील सर्वात…धारावी पुनर्विकासाबाबत एकनाथ शिंदेंचे महत्वाचे विधान
मात्र, उबाठा गट याला विरोध करू पाहत असल्याने धारावीकर नाराज झाले आहेत. अशा या धारावीकरांना हक्काचे घर मिळू नये यासाठी प्रयत्नशील असलेल्या उबाठा गटाला शिवसेनेने व्यंगचित्रातून फटकारले आहे. धारावी बचाव आंदोलनाच्या फलकास एका सामान्य धारावीकराला स्वतः उद्धव ठाकरे बांधत असल्याचे या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे. तसेच, तो हतबल धारावीकर समोर पडलेल्या धारावी पुनर्वसन प्रकल्पातील घराच्या चावीकडे बोट दाखवत असल्याचे दृश्यंही यात दाखवले गेले आहे. सध्या हे व्यंगचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अनेक जण सोशल मीडियावर या व्यंगचित्राचा आधार घेऊन व्यक्त होत आहेत.
धारावी पुनर्विकासाबाबत एकनाथ शिंदेंचे महत्वाचे विधान
धारावीचा चेहरा बदलण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले असून, लवकरच धारावी हे आशियातील सर्वात सुनियोजित पुनर्वसित शहर म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. झोपडपट्टीची ओळख पुसून टाकत, धारावी आता सामाजिक न्याय आणि आर्थिक सक्षमीकरणाचे प्रतीक ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृह येथे या प्रकल्पाचा आढावा घेण्यात आली. त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे माध्यमांशी संवाद साधत होते.