शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचं निधन; शिवसेनेच्या जडणघडणीत बजावलीय मोठी भूमिका
शिवसेनेच्या जडणघडणीत मोठी भूमिका बजावणारे ठाणे महापालिकेचे प्रथम नगराध्यक्ष, प्रथम महापौर आणि शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचं रविवारी ठाण्यात निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ठाणे शहराच्या विकासात तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत प्रधान यांनी मोठे योगदान राहिलं आहे. त्यांच्या निधनामुळे सर्वच क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.त्यांची अंत्ययात्रा सोमवारी सकाळी १० वाजता त्यांच्या निवासस्थानावरून निघणार आहे.
सतीश प्रधान गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. त्यामुळे सक्रिय राजकारणापासून ते अलिप्त होते. रविवारी, दुपारी ठाण्याच्या खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी, सकाळी १० वाजता ठाण्यातील जवाहरबाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सतीश प्रधान यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात मोठी पोकळीक निर्माण झाल्याची भावना मान्यवरांकडून व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी सतीश प्रधान यांची रुग्णालयामध्ये जाऊन शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट घेतली होती.
ठाणे शहरात शिवसेनेचा पाया रोवण्यात सतीश प्रधान यांचा मोठा वाटा होता. १९७४-८१ मध्ये ते ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष होते. तर १९८६-८७ या काळात त्यांनी शहराचं पहिलं महापौरपद भूषविलं. यासह शिवसेनेचे राज्यसभा सदस्य, संसदीय गटनेते आणि केंद्रातील विविध समित्यांवर त्यांनी काम केले. राजकारणासोबतच क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी केलेले कार्यही उल्लेखनीय आहे. त्या काळामध्ये कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळत नव्हता, म्हणून ज्ञानसाधना महाविद्यालय त्यांनी सुरू केलं. शहराच्या सांस्कृतिक सामाजिक जडणघडणीत त्यांचे योगदान लाभले आहे. दादोजी कोंडदेव स्टेडियम आणि राम गणेश गडकरी रंगायतन सुद्धा सतीश प्रधान यांच्या संकल्पनेतून साकार झालं आहं.
बाबरी प्रकरणात सतीश प्रधान यांच्यावरही आरोपपत्र दाखल होतं. त्यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली होती. “मी लालकृष्ण अडवाणी आणि मनोहज जोशी यांना जमावाला नियंत्रित करताना, त्यांना शांत करताना आणि पुढे जाण्यापासून रोखताना पाहिलं होतं. परंतु जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. जमावाच्या उद्रेकामुळे बाबरी मशीदची घटना घडली.” असं त्यांनी कोर्टात सांगितलं होतं.
हिंदुह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ शिवसेना नेते, ठाणे नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष व ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौर सतीश प्रधान यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले.
सतीश प्रधान यांनी ठाणे शहराच्या… pic.twitter.com/sRuGJo4Uxz
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 29, 2024
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ शिवसेना नेते, ठाणे नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष व ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौर सतीश प्रधान यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले.सतीश प्रधान यांनी ठाणे शहराच्या विकासामध्ये तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक मजबुतीसाठी मोठे योगदान दिले. ठाणे शहर व परिसरातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ४४ वर्षांपूर्वी ज्ञानसाधना महाविद्यालय सुरू करून त्यांनी मोलाचा वाटा उचलला आहे. त्यांच्या निधनाने ठाणे शहराची आणि शिवसेनेची मोठी हानी झाली आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.