मुंबई : आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीच्या आधी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या आरोपांवर भूमिका मांडली.
गणपत गायकवाड यांच्यावर कारवाई करावी
गणपत गायकवाड यांनी माध्यमांसमोर एकनाथ शिंदे यांच्याबाबत असे गंभीर आरोप करणे चुकीचं आहे, असं मत शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी फडणवीसांकडे मांडलं. तसेच गणपत गायकवाड यांच्यावर पक्षाकडून योग्य ती कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. याबाबत शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली.
प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. तसेच “मंत्रिमंडळाच्या बैठकीत बऱ्याच विषयांमध्ये चर्चा झाली. याबाबतची अधिकृत प्रेसनोट मुख्यमंत्री कार्यालयाकडून दिली जाईल”, असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं.
आमचं मत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडलं
“आम्ही सर्व शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत होतो. मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी आम्ही उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. गोळीबाराच्या विषय वेगळा. पण भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जे तथ्यहीन, बिनबुडाचे, ज्याच्यामध्ये कसलाही अर्थ नाही, असे आरोप केले. या आरोपांबद्दल आम्ही आमचं मत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडलं आहे. हे चुकीचं आहे. त्याअनुषंगाने भाजप पक्षाने योग्य ती कारवाई करावी, असं मत आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडलेलं आहे”, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली.
‘समन्वय समितीच्या नियमित बैठका होतील’
“समन्वय समितीच्या नियमित बैठका होत असतात. मध्यंतरीच्या काळात समन्वय समितीच्या बैठका काही कारणास्तव होऊ शकलेल्या नाहीत. पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्र बसतील. नियमित समन्वय समितीच्या बैठका कशाप्रकारे घ्याव्यात याबाबतचं पुढचं सगळं धोरण ठरवतील. त्याप्रमाणे ते समन्वय समितीला कळवतील. त्यामुळे समन्वय समितीच्या यापुढे नियमित बैठका होतील”, अशी माहिती शंभूराज देसाई यांनी दिली.
‘गणपत गायकवाड यांनी एकदासुद्धा याबाबतचा विषय मांडला नाही’
“मी समन्वय समितीचासुद्धा सदस्य आहे. गणपत गायकवाड ज्या जिल्ह्याचे आमदार आहेत त्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे. या दीड वर्षात आमदार गणपत गायकवाड यांनी एकदासुद्धा याबाबतचा विषय मांडलेला नाही. किंवा समन्वय समितीच्या बैठकीतही यापूर्वी याविषयी चर्चा झालेली नाही. हा विषय आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप केला, तो पहिल्यांदाच केलेला आहे. आम्ही आमचं मत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडलेलं आहे. निश्चितपणे त्याची योग्य दखल फडणवीस घेतील”, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.