सातारा विकासकामांना गती; नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी समन्वयाने काम करा, शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रशासनाला सूचना
सातारा: सातारा शहराच्या विस्तारवाढीनुसार त्या- त्या भागात आवश्यक असणारी विकासकामे मार्गी लावण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी सातारा पालिका प्रशासनाने प्राधान्य द्यावे. नगरसेवक आणि प्रशासनातील अधिकारी यांनी समन्वय साधून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे काम करावे, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या.
ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी शाहूपुरी रांगोळी कॉलनी येथील जलतरण तलावाच्या सुरु असलेल्या कामाची तसेच चार भिंती परिसराची पाहणी केली. शाहूनगर मंगळाई कॉलनी येथील पाण्याच्या टाकीची पाहणी केली. शाहूपुरी येथील पवार कॉलनी येथे ५० लाख रुपये निधीतून बांधण्यात येत असलेल्या वाचनालय व अभ्यासिकेच्या इमारतीचे भूमिपूजन ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
शाहूनगर येथील छ. सुमित्राराजे भोसले सोसायटी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन कि बात’ या कार्यक्रमाच्या १३५ व्या भागाचे श्रवण ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले. यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, बांधकाम सभापती विनोद खंदारे, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नियोजन सभापती अशोक शेडगे, महिला बालकल्याण समिती सभापती मोनिका घोरपडे, उप सभापती सुजाता गिरिगोसावी, गटनेते अविनाश कदम, नगरसेवक अक्षय जाधव, राजू गोरे, विश्वतेज बालगुडे, सचिन पाटोळे, रविराज किर्दत, फिरोज पठाण, दिलीप म्हेत्रे, विनोद मोरे, सुशांत महाजन, रवी पवार, नगरसेविका हेमलता भोसले, अनिता फरांदे, पूनम निकम, शारदा वाघमोडे, वनिता शिंदे यांच्यासह सर्व आजी माजी नगरसेवक, मुख्याधिकारी विनोद जळक, नगर अभियंता विनोद दहिफळे, पाणीपुरवठा अभियंता शहाजी वाठारे, विद्युत अभियंता शिंदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे आदी उपस्थित होते.
PCMC Water Update: पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी महापालिकेने कसली कंबर, नवे वेळापत्रक जाहीर
पाहणी करून ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. सातारा शहराचा विस्तार वाढला असून अनेक ठिकाणी ३० ते ३५ वर्ष जुन्या पाईपलाईन असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होण्याच्या घटना घडत आहेत. त्या- त्या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकण्यात आल्या आहेत तसेच नवीन पाणीसाठवण टाक्या बांधण्यात आल्या आहेत. ज्या टाक्यांची कामे पूर्ण झाली असतील त्या टाकीतून पाणी वितरण सुरु करा, नागरिकांची पाणी समस्या सोडवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करा, अशा सक्त सूचना ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी पालिकेचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना केल्या.
सिंदखेड राजा विकासाला गती! विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा; आणखी १२ गावांचा समावेश






