मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्र भाजपमध्ये एकच खळबळ झाली. 48 जागांपैकी फक्त 9 जागांवरच भाजपला यश मिळाले आहे. याचा परिणाम फक्त राज्यातील राजकारणावर नाही कर केंद्रातील राजकारणावर देखील झाला आहे. त्याचसोबत आगामी विधानसभेच्या निवडणुकीवर देखील याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी मला पदावरुन मुक्त करावी अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा सुरु आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जनता तुम्हाला जबाबदारीतून मोकळं करणार
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय़ राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीवर जोरदार निशाणा साधला. माध्यमांशी संवाद साधताना खासदार राऊत म्हणाले, जनतेनं त्यांना जबाबदारीतून मोकळं केलं आहे. लोकशाहीमध्ये जनता महत्वाची असते. जनतेने नरेंद्र मोदी यांनाही जबाबदारीतून मोकळं केलं आहे. विधानसभेच्या निवडणुका घ्या, महापाहिलकेच्या निवडणुका घ्या, जनता तुम्हाला जबाबदारीतून मोकळं केल्याशिवाय राहणार नाही. नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व असल्यामुळे अशा प्रकारची नौटंकी करण्याची भारतीय जनता पक्षाच्या लोकांना सवय आहे. देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या वरिष्ठांनी अशा प्रकारची भूमिका घ्यायला सांगितली असल्याची माझी माहिती आहे. कारण त्यांना अशाच प्रकारे योगी आदित्यनाथ यांचाही राजीनामा घ्यायचा आहे, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे.
ते पाप आता तुमच्या छाताडावर बसेल
पुढे ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की विधानसभेसाठी वेळ मिळावा. विधानसभेला त्यांनी जेवढा वेळ हवा तेवढा घ्यावा. मात्र, 185 जागा महाविकास आघाडीच्या आल्याशिवाय राहणार नाही. आम्ही लोकसभा निवडणुकीत सांगत होतो की, महाविकास आघाडी महाराष्ट्रात 30 जागा जिंकेल, तेवढ्या आम्ही जिंकल्या. आता आम्ही सांगतो महाविकास आघाडी विधानसभेला 185 जागा जिंकेल. देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारीतून मोकळं व्हावं, कारण महाराष्ट्रात जे पाप करून ठेवलं, ते पाप आता तुमच्या छाताडावर बसेल” अशा शब्दांत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.